गोवा येथे नुकत्याच संपन्न झालेल्या ‘दहाव्या नॅशनल लेव्हल ईकोफेस्ट २०१७’ मध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालयाला नेत्रदीपक यश प्राप्त झाले. या ईकोफेस्ट मध्ये महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांतील ११ महाविद्यालयातून सुमारे १२० स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धांमध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालयाने बाजी मारत सहा बक्षिसांसह जनरल चॅम्पियनशिपचा बहुमान प्राप्त केला.
स्पर्धेत ग्रुप डिस्कशनमध्ये गौरव महाजनी याने प्रथम क्रमांक, निबंधासाठी श्रेयसी शिरसाट हिने प्रथम क्रमांक, वादविवाद स्पर्धेकरिता गौरव महाजनी आणि श्रेयसी शिरसाट यांच्या गटाने प्रथम क्रमांक पटकावला. रांगोळी स्पर्धेत ओंकार कदम आणि श्रावणी देसाई यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला. तर सांघिक स्पर्धांमध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या ‘एक दिन’ या पथ नाट्याला द्वितीय क्रमांक मिळाला. या स्पर्धेत प्रणव यादव, नयन जाधव, दुर्गा साखळकर, श्रुती मयेकर यांनीही सहभाग घेतला. ई ट्युन्स या अर्थशास्त्रावर आधारित गाण्यांच्या स्पर्धेतही महाविद्यालयाला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले.
सर्वाधिक विजेतेपदांमुळे महाविद्यालयास जनरल चॅम्पियनशिपचा बहुमान मिळाला. यशस्वी विद्यार्थांना डॉ. यास्मिन आवटे आणि प्रा. अजिंक्य पिलणकर यांचे मार्गदर्शन लाभले.
स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक प्राध्यापक यांचे गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर आणि वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.