gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘वृद्धत्व:आरोग्य व कार्यक्षमता कार्यरत राखणे’ या विषयावरील वेबीनारचे आयोजन

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा जैवतंत्रज्ञान विभाग आणि इंडियन वूमन सायंटीस्ट असोसीएशन यांच्या संयुक्तविद्यमाने दि. ६ डिसेंबर रोजी आरोग्यविषयक परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. सदर परिसंवादाचा विषय ‘वृद्धत्व व त्याअनुषंगाने आरोग्य व कार्यक्षमता कार्यरत राखणे’ असा होता. सदर कार्यक्रम ऑनलाइन व ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने आयोजित केला होता.

कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी महाविद्यालयाचा इतिहास व प्रगतीचा आलेख याचा अल्प परिचय करून दिला. याप्रसंगी त्यांनी वृद्धत्व व त्याअनुषंगाने रोजच्या जीवनातील वाढत्या समस्या यांविषयी विस्तृत चर्चा केली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. सुरेखा झिंगडे, ट्रस्टी, इंडियन वूमन सायंटीस्ट असोसिएशन यांनी भूषविले. याप्रसंगी त्यांनी आपल्या एनजीओच्या कार्यप्रणालीचा आढावा घेतला. तसेच सदर संस्थेतर्फे राबविल्या जाणाऱ्या अनेकविध उपक्रमांविषयी चर्चा केली.

कार्यक्रमास प्रमुख वक्त्या म्हणून जहांगिर हॉस्पिटल, पुणे येथील फ़िजिओथेरपी विभागप्रमुख डॉ. राधिका पाटील यांची उपस्थिती लाभली. त्यांनी आपले विचार व्यक्त करताना अनेकविध पैलूंवर चर्चा केली. भारतात सध्या व भविष्यात येऊ घातलेल्या वाढीव वृद्धसंख्या, घटत असलेला जन्मदर व त्या अनुषंगाने निर्माण होऊ शकणाऱ्या समस्या, उपाययोजना या मुद्यांचा समावेश होता. विविध उपचारपध्दती, आहार शिथिलता, व्यायाम, नवनवीन उपचार आणि औषधे यांवर देखील त्यांनी भाष्य केले.

कार्यक्रमाचे सुयोग्य आयोजन व यशस्वी सांगता यामध्ये शास्त्र शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी व जैवतंत्रज्ञान विभाग प्रमुख प्रा. रश्मी भावे यांचे योगदान लाभले. तांत्रिक भाग श्री. शुभम पांचाळ यांनी पाहिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बॉस्को बोथेलो या विद्यार्थ्याने केले. यशस्वी नियोजन केल्याबद्दल प्राचार्यांनी आयोजकांचे अभिनंदन केले. यशस्वी नियोजन केल्याबद्दल प्राचार्यांनी आयोजकांचे अभिनंदन केले व विभागाच्या भावी वाटचालीस तसेच भविष्यात असे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला विद्यार्थी, प्राध्यापक आणि इतर उपस्थितांचा अत्यंत चांगला प्रतिसाद लाभला.

Comments are closed.