गोगटे जोगळेकर महाविद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची १४८वी जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रीतिमेचे पूजन करून करण्यात आली. या कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर म्हणाले की, ‘लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी सत्तेचा वापर प्रजेच्या कल्याणासाठी करावयाचा असतो हे आपल्या कृतीतून दाखविण्याचे कार्य केले. त्यांनी आपल्या गादीची ताकद जनसामान्यांसाठी खर्ची घातली. वसतिगृहांची स्थापना केली, कला व कलाकारांना उदार आश्रय दिला, आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन दिले. हा प्रजेच्या कल्याणासाठी झटणारा राजातील मनुष्य व मनुष्यातील राजा होता.’
राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे भारतातील पहिले राज्यकर्ते होते त्यांनी आरक्षणाची प्रक्रिया शांततापूर्ण मार्गाने आपल्या संस्थानात प्रत्यक्षात अंमलात आणली. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, कृषी आणि जलव्यवस्थापन या कार्याला तोड नाही. आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर महाराजांनी कोल्हापूर संस्थानात अनेक सामाजिक, आर्थिक व राजकीय सुधारणा घडविल्या. अशा या द्रष्ट्या राजर्षींच्या कर्तृत्वाची ओळख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे उद्दिष्ट या कार्यक्रमाच्या निमित्ताने साध्य करता आले. महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी या कार्यक्रमास व सामाजिकत न्याय दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. चित्र गोस्वामी, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य ए. बी. उरुणकर, निबंधक श्री. रवींद्र केतकर, ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे यांच्यासह अनेक विभागांचे विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन कार्यक्रम समितीप्रमुख डॉ. निधी पटवर्धन यांनी केले.




Visitors Online : 3