दरवर्षीप्रमाणे या वर्षीही गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागातर्फे भौतिकशास्त्रातील काही मुलभूत संकल्पनांशी संबंधित प्रयोगांचे प्रदर्शन दि. २४ ब्रुवारी २०२४ रोजी आयोजित करण्यात आले होते. ‘कम अँड लर्न फिजिक्स – अ फिजिक्स फेअर’ या उपक्रमांतर्गत इ. ९ वीच्या विद्यार्थ्यांकरिता भौतिकशास्त्रातील उपयुक्त माहिती देणारे विविध प्रयोग यामध्ये मांडण्यात आले होते. उर्जा, ध्वनी, प्रकाश, बल, विद्युत चुंबकीय परिणाम यांवर आधारित प्रयोग आणि प्रतिकृतींचा वापर संकल्पना स्पष्ट होण्यासाठी करण्यात आला.
महाविद्यालयातील शास्त्र शाखेच्या भौतिकशास्त्र विषयाच्या पदवी आणि पदव्युत्तर विभागातील विद्यार्थ्यांनी सदर प्रयोगांची मांडणी केली व शालेय विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत त्यातील वैज्ञानिक तत्वे प्रयोगांसह समजावून सांगितली. या प्रदर्शनाचा जीजीपीएस आणि शिर्के प्रशालेतील विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे संकल्पना समजावून घेण्याचा उपक्रम असल्याने सदर विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे आणि सकारात्मक प्रतिसाद दिला.
सदर उपक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर आणि शास्त्र शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी सदिच्छा भेट दिली. हा सुनियोजित उपक्रम भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. भूषण ढाले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विभागातील इतर प्राध्यापक व प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने यशस्वीपणे संपन्न झाला.






Visitors Online : 2