भारतीय नागरिकांच्या जीवनात संविधानाने मूलगामी बदल घडवून आणले आहेत. हे बदल घडवून आणण्याचे श्रेय संविधान निर्मात्यांच्या दूरदृष्टीला द्यावे लागेल. नागरिकांनी संविधानात नमूद केलेल्या मूलभूत अधिकारांबरोबरच मूलभूत कर्तव्यांची देखील जाणीव ठेवून त्यांचे पालन केल्यास भारत हे राष्ट्र प्रगतिपथावर जाईल. एक आदर्श संविधान, एकआदर्श राष्ट्र म्हणून जगाला त्याची ओळख होईल, असे प्रतिपादन डॉ. गुलाबराव राजे यांनी येथे केले. गोगटे जोगळेकर महाविद्यालयात (स्वायत्त) संविधान सन्मानसमितीच्या वतीने आयोजित संविधान सन्मान रॅलीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
गोगटे जोगळेकर महाविद्यालयात संविधान दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संविधान सन्मान समिती, जिल्हा रत्नागिरीच्या वतीने रत्नागिरी ते चिपळूण यादरम्यान काढण्यात आलेल्या संविधान सन्मान रॅलीचे उद्घाटन जवाहर क्रीडांगणावर गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांच्या हस्ते झाले. प्रत्येक महाविद्यालयात ही संविधान सन्मान रॅली जाणार असून, या रॅलीची सांगता संध्याकाळी चिपळूण येथे होणार आहे. डॉ. राजे पुढे म्हणाले, गेल्या ७५ वर्षांच्या वाटचालीत संविधानाने अनेकवेळा महत्वाची भूमिका बजावली आहे. नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे रक्षण करण्याचे आणि न्यायालयांचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचे कार्य संविधानाने केले आहे. संविधान जपण्याची जबाबदारी आपणा सर्वांची असूनआपण ती समर्थपणे पार पाडली पाहिजे, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. आपल्या मनोगतातून त्यांनी संविधानाची कार्ये, भूमिका आणि संविधानातील मूलभूत अधिकार आणि मूलभूत कर्तव्ये यावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतरप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी उपस्थितविद्यार्थी, कार्यकर्ते यांच्याकडून संविधानाच्या सरनाम्याचे सामूहिक वाचन करून घेतले. याप्रसंगी संविधान सन्मान समितीच्या वतीने राज्यघटनेच्या सरनाम्याच्या काही प्रती डॉ. गुलाबराव राजे यांनी प्राचार्य डॉ.साखळकर यांच्याकडे सुपूर्त केल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी संविधान दिनाची पार्श्वभूमी आणि महत्त्व सांगून महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यकमांची माहिती उपस्थितांना दिली. २०२४-२५ हे वर्ष भारतीय संविधानाचे अमृतमहोत्सवी वर्ष आहे. भारतीय संविधान हे नागरिकांशी संबंधीत महत्वाचा दस्ताऐवज असून, एक जबाबदार नागरिक म्हणून आपण संविधान, लोकशाही मूल्यांचे जतन केले पाहिजे, असे सांगितले. आपल्या मनोगतात त्यांनी राज्यघटनेच्या सरनाम्यातील बदलासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ताज्या निर्णयाचा उल्लेख केला.
याप्रसंगी व्यासपीठावर संविधान सन्मान समितीचे अध्यक्ष डॉ. गुलाबराव राजे, प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, कलाशाखा उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी, हिंदी विभाग प्रमुख डॉ. शाहूमधाळे आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन राज्यशास्त्र विभागाचे प्रा. निलेश पाटील यांनी केले.
मुख्य कार्यक्रमानंतर महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात संविधानविषयक ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. साखळकर म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली राज्यघटनेची उद्देशिका अत्यंत आशयपूर्ण असून, संपूर्ण संविधानाचे सार तिच्यातून व्यक्त होते. आपण सरनामा, संविधानाला आदर्श मानून वाटचाल केली पाहिजे, असे ते पुढे म्हणाले. याप्रसंगी ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे, सहायक ग्रंथपाल श्री. उत्पल वाकडे, कार्यालय प्रमुख श्री. संजीव दांडेकर आदि उपस्थित होते.
संविधान दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयात राज्यघटनेच्या सरनाम्याचे सामूहिक वाचन, पोस्टर्स प्रदर्शन अशा विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. या अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना आणि राज्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पोस्टर्सचे प्रदर्शन करण्यात आले. राज्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालय आणि रत्नागिरी शहरातील शाळांमध्ये जाऊन राज्यघटनेच्या सरनाम्याचे सामूहिक वाचन केले.
या दोन्ही कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजना करिता गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांचे मार्गदर्शन तर प्रशासकीय उपप्राचार्य, तिन्ही शाखांच्या उपप्राचार्या, डॉ. शाहू मधाळे, ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे, राष्ट्रीय छात्र सेनेचे प्रमुख प्रा. अरुण यादव आणि कॅप्टन डॉ. स्वामिनाथन भट्टर, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. सचिन सनगरे, प्रा.कृष्णात खांडेकर, ग्रंथालयीन आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. याप्रसंगी महाविद्यालयातील विविध विभागप्रमुख, शिक्षक, राष्ट्रीय सेवा योजना आणि राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.