gogate-college-autonomous-updated-logo

‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ अभियान २०२५ अंतर्गत कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात ‘मकर संक्रांत’ निमित्त कोकण विषयक ‘ग्रंथ प्रदर्शनाचे’ आयोजन

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात महाराष्ट्र शासनाच्या ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ अभियान २०२५ या वाचन विषयक उपक्रमांतर्गत मंगळवार दि. १४ जानेवारी २०२५ रोजी ‘मकर संक्रांत’ आणि मार्लेश्वर यात्रेचे औचित्यसाधून ‘कोकण: पर्यटन, सण आणि उत्सव’ या विषयाला वाहिलेल्या ग्रंथ संग्रहाचे प्रदर्शन आयोजन करण्यात आले. प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांच्या हस्ते रत्नागिरीचे ग्रामदैवत श्रीदेव भैरीचे पूजन करून या ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न झाले. याप्रसंगी कला विभागाच्या उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी, हिंदी विभागप्रमुख डॉ. एस. डी. मधाळे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी, ग्रंथालय समितीच्या समन्वयक डॉ. कल्पना आठल्ये, मराठी विभागप्रमुख डॉ. शिवराज गोपाळे, ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. विद्याधर केळकर, उर्दू विभागप्रमुख डॉ. दानिश गनी आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि उपस्थितांचे स्वागत सहायक ग्रंथपाल श्री. उत्पल वाकडे यांनी केले. यावेळी त्यांनी कोकण विषयक ग्रंथ प्रदर्शनाच्या आयोजनाचे उद्देश विषद केले.

उपस्थितांशी संवाद साधताना प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ अभियान २०२५ या वाचन विषयक अभियानाची आणि महाविद्यालयाने आयोजित केलेल्या विविध वाचन विषयक नाविन्यपूर्ण उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. आपलं कोकण, कोकणातील पर्यटन सण आणि उत्सव यांची माहिती होण्यासाठी आजचे ग्रंथ प्रदर्शन सर्वांना उपयुक्त ठरेल असा विश्वास व्यक्त केला तसेच सर्वांना मकर संक्रांत पर्वाच्या शुभेच्छा दिल्या.

सदर ग्रंथप्रदर्शन वाचकांसाठी दोन दिवस खुले ठेवण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला प्राध्यापक, अध्यापक, ग्रंथालय कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

कोकण विषयक 'ग्रंथ प्रदर्शनाचे' आयोजन कोकण विषयक 'ग्रंथ प्रदर्शनाचे' आयोजन
Comments are closed.