gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महविद्यालयात ‘प्रा. पी. एन. देशमुख स्मृती कार्यक्रम’ उत्साहात साजरा

वनस्पतीशास्त्र विभाग गोगटे जोगळेकर महविद्यालयामार्फत दरवर्षी विविध कार्यक्रम राबविले जातात. त्यातीलच एक महत्वाचा कार्यक्रम म्हणजे प्रा. पी. एन. देशमुख स्मृती कार्यक्रम. विभागातील भूतपूर्व विभागप्रमुख प्रा. पी. एन. देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गेली ७ वर्ष हा स्मृती कार्यक्रम राबविण्यात येतो. विद्यमान वर्षी दि. १६ जानेवारी २०२५ या दिवशी या व्याख्यानमालेचे प्रमुख व्याख्याते डॉ. योगेश फोंडे (संशोधक आणि उपजिविका तज्ज्ञ, कोल्हापूर ) यांचे टसर (वन्य रेशीम)- शाश्वत विकास आणि वनसंवर्धन प्रकल्प या विषयी व्याख्यान संपन्न झाले. तसेच प्रा. पी. एन. देशमुख यांच्या कन्या डॉ. मंजुश्री देवधर यांनी “गारसेनिया इंडिका (कोकम)” च्या फळांच्या सालींपासून प्रोटेक्टिव्ह रचना तयार करताना या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रा. शरद आपटे यांनी प्रा. पी. एन. देशमुख यांच्या कार्याचे आणि त्यांच्या महाविद्यालयातील कामगिरीची ओळख करून दिली. विभागाचे माजी विभागप्रमुख प्रा. जी. एस. कुलकर्णी यांनी काही मजेशीर आठवणीतून प्रा. पी. एन. देशमुख यांचा त्यांच्या सहकाऱ्यांवरती असलेला विश्वास आणि आत्मीयता यांचे दर्शन घडवणाऱ्या काही आठवणींना उजाळा दिला.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी या व्याख्यानमालेचे महत्त्व विशद करताना यानिमित्ताने आपल्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांना ऐकण्याची आणि त्यांचे अनुभव समजून घेण्याची संधी मिळते. आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये विद्यार्थ्यांना एकाच वेळी अनेक विषयांचा अभ्यास करण्याची संधी उपलब्ध असतानाच महाविद्यालयातून पदव्युत्तर होऊन बाहेर पडताना विद्यार्थी अनेक कौशल्यधारक असतील अशी व्यवस्था असल्याचे त्यांनी नमूद केले. हा कार्यक्रम शास्त्र विभागाच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, माजी विभागप्रमुख डॉ. मंगल पटवर्धन, जीवशास्त्रविभाग प्रमुख डॉ. मधुरा मुकादम, गणित विभागप्रमुख डॉ. दिवाकर करवंजे, श्री. देवधर यांच्या उपस्थितीत पार पडला.

कार्यक्रमाच्या अनुषंगाने पावर पॉइंट प्रेझेंटेशन, पोस्टर, फोटोग्राफी तसेच रील मेकिंग स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या विजेत्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले. याप्रसंगी डॉ. योगेश फोंडे यांनी आईन वृक्षापासून गावच्या विकासास चालना देणाऱ्या टसर म्हणजेच वन्य रेशीम या शाश्वत विकास प्रकल्पाची एक यशस्वी चित्रफीत विद्यार्थ्यांसमोर सादर करून भविष्यात अशा पर्यावरण पूरक प्रकल्पातून आपण गावचा विकास कशा प्रकारे करू शकतो याबद्दल विद्यार्थ्यांना प्रेरित केले. प्रा. मंजुश्री देवधर यांनी कोकम या कोकणातील मुख्य फळांमध्ये त्यांनी केलेल्या संशोधनात्मक कार्यांचे आणि त्याच्या उपयोगितेचे सादरीकरण करताना या प्रदेशनिष्ठ वनस्पतीचे महत्व विशद केले.

कार्यक्रमातील पाहुण्यांची ओळख डॉ. विराज चाबके व प्रा. प्रियांका शिंदे-अवेरे यांनी करून दिली. वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सोनाली कदम यांनी आभार मानताना दोन्ही व्याख्यानांचा विद्यार्थ्यांच्या जडणघडणीवर परिणाम होणे गरजेचे असल्याचे सांगितले. डॉ. फोंडे यांचे हे व्याख्यान रेशीम किड्यांची पैदास आणि त्यांना लागणाऱ्या योग्य त्या वनस्पतींचा शोध त्यांचे संगोपन आणि संवर्धन करीत असताना आपण सक्षम होत आपल्या बरोबरच गावाला देखील आर्थिक सक्षमता देणे शक्य आहे हे सांगितले तसेच डॉ. देवधर यांनी कोकणातील कोकमापासून सनस्क्रीन बनवण्यातील संशोधन सांगितले आणि वनस्पती शास्त्रामध्ये असणाऱ्या विविध संशोधनाच्या वाटा विद्यार्थ्यांनी या निमित्ताने शोधण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. परेश गुरव यांनी केले. या कार्यक्रमाला प्राध्यापक, विद्यार्थी आणि कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

प्रा. पी. एन. देशमुख स्मृती कार्यक्रम प्रा. पी. एन. देशमुख स्मृती कार्यक्रम
प्रा. पी. एन. देशमुख स्मृती कार्यक्रम प्रा. पी. एन. देशमुख स्मृती कार्यक्रम
Comments are closed.