प्रतिवर्षी दि. 2 फेब्रुवारी हा दिवस ‘जागतिक पाणथळ दिन’ म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. पाणथळ प्रदेशांच्या महत्वाबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा या दिवसाचा उद्देश असतो. ‘उज्वल भवितव्यासाठी पाणथळी’ हा यंदाच्या जागतिक पाणथळ दिनाचा विषय होता. विद्यमान वर्षी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागातर्फे या जागतिक पाणथळ दिनानिमित्त व्याख्यान, क्षेत्रभेट यांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सोनाली कदम म्हणाल्या की वनस्पती शास्त्र विभागामध्ये पर्यावरण विषयक विविध कार्यक्रम सतत केले जातात ज्यामुळे विद्यार्थी आणि नागरिक यांना विविध वनस्पती आणि त्यांचे पर्यावरण याविषयी सजगता निर्माण होते.
या विषयाला अनुसरून वनस्पतीशास्त्र विभागातील प्रा. शरद आपटे यांचे विशेष व्याख्यान डॉ. ज.श केळकर सभागृहामध्ये आयोजित करण्यात आले होते.आपटे यांनी व्याख्यानात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पाणथळ जागा म्हणजे काय आणि या पाणथळ जागेचे जैवविविधतेच्या दृष्टीने असलेले महत्त्व विशद केले. पाणथळ दिनाची पार्श्वभूमी सांगताना ते म्हणाले, जागतिक स्तरावर पाणथळ प्रदेशांचा संवर्धन आणि संरक्षण करण्याच्या दृष्टीने 2 फेब्रुवारी 1971 साली इराणमध्ये रामसार या ठिकाणी घेण्यात आलेल्या परिषदेच्या अनुषंगाने पाणथळ प्रदेशांचे संवर्धन करण्यासाठी त्या परिषदेत 2 फेब्रुवारी हा दिवस जागतिक पाणथळ दिवस म्हणून साजरा केला जावा असं ठरलं पण 1997 पासून हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. आणि भारत हा या रामसार कराराचा एक सदस्य देश बनला. पाणथळ जागांबद्दल माहिती देत असताना पाणथळ जागांमध्ये समाविष्ट होणाऱ्या तळी, धरणे, कांदळवन तसेच वेगवेगळ्या पाणथळ क्षेत्राबद्दल त्यांनी माहिती दिली. या अधिवासातील फुलोरा त्याचप्रमाणे पाणथळींचे असलेले पर्यावरणीय महत्त्व इत्यादी गोष्टींबद्दल फुलोरांच्या छायाचित्रातून तसेच चित्रफितीच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रियांका शिंदे-अवेरे यांनी केले तर आभार डॉ. विराज चाबके यांनी मानले. सदर कार्यक्रमासाठी तांत्रिक मदत प्रा. परेश गुरव यांनी केली. जागतिक पाणथळ दिनाच्या अनुषंगाने दि. 6 फेब्रुवारी 2025 या दिवशी वनस्पतीशास्त्राच्या सर्व विद्यार्थ्यांनी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील आंबाघाट परिक्षेत्रातील पाणथळ क्षेत्राला भेट दिली. या पाणथळ परिसरातील जैविक आणि अजैविक घटकांचे अवलोकन सजीव सृष्टीच्या जीवनातील पाणथळींचे महत्त्व विद्यार्थ्यांनी जाणून घेतले. प्रा.शरद आपटे यांनी या क्षेत्रभेटीदरम्यान विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचा तसेच क्षेत्रभेटीचा आनंद वनस्पती शास्त्रातील सर्व विद्यार्थ्यांनी घेतला.