भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्यसाधून दिनांक १२ एप्रिल २०२५ रोजी गोगटे-जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) रत्नागिरी येथे दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी व्याखानाचे आयोजन करण्यात आले होते.यासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून फर्ग्युसन महाविद्यालय येथील उप-प्राचार्य आणि राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ.प्रकाश पवार यांना निमंत्रित करण्यात आले होते.त्यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय लोकशाही या विषयावर आपले विचार मांडले.
आपल्या व्याख्यानाच्या सुरुवातीस डॉ.पवार यांनी डॉ.आंबेडकरांच्या चळवळीतील कोकणवासीयांच्या योगदानाचा मागोवा घेतला.डॉ.आंबेडकर यांच्या योगदानाप्रती ऋण व्यक्त करण्यासाठी त्यांच्या अनुयायांकडून जयंतीला सुरुवात झाल्याचे त्यांनी सांगितले.लोकशाहीचे आधारस्तंभ म्हणून भारतीय लोक बाबाहेबांची जयंती साजरी करताना दिसतात.ज्ञानाचे प्रतिक,लोकशाहीचे प्रतिक म्हणून जग बाबासाहेबांकडे पाहते. आज मात्र बाबासाहेबांच्या अनुयायांना खुश करण्यासाठी जयंती साजरी केली जाते हे वास्तव त्यांनी अधोरेखित केले.१९२० नंतर महात्मा गांधी आणि डॉ.आंबेडकर यांचे नेतृत्व पुढे आले हे सांगताना १९२० ते १९३५ आणि १९३५ ते १९५६ अशा दोन कालखंडात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचे वर्गीकरण करत डॉ.पवार यांनी डॉ.आंबेडकरांच्या योगदानाचा मागोवा घेतला.
आपल्या व्याख्यानात ते पुढे म्हणाले की,हजारो वर्षाची वर्णव्यवस्था आणि अस्पृश्यता नष्ट करण्याचा प्रयत्न बाबासाहेबांनी केला.त्यांनी भारतातील जातीव्यवस्था ठिसूळ केली.मागासलेल्या जनतेला आत्मभान दिलं,त्यांना लढायला शिकवलं,सोबत विचारांची संहिता दिली.समाजातील पुरुषप्रधान संस्कृतीला धक्का दिला,धर्मांतर केलं,लोकशाहीसाठी संविधान दिलं या सर्व बाबी लोकशाही बळकट करण्यासाठीच होत्या.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित लोकशाहीची व्याख्या करताना ते म्हणाले की.रक्ताचा एक थेंब न सांडता सामाजिक संबंधातील बदल म्हणजे लोकशाही होय.बाबासाहेब लोकशाहीकडे एक जीवन प्रणाली म्हणून पाहतात.लोकशाही ही स्वातंत्र्य,समता आणि न्याय या तत्वावर उभी असते त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर धर्म,वंश,जात.जन्म या आधारांना नाकारतात हे डॉ.पवार यांनी स्पष्ट केले.डॉ.आंबेडकरांनी संविधान सभेत सामाजिक आणि आर्थिक समतेचा पुरस्कार केला कारण सामाजिक –आर्थिक समतेशिवाय संविधान कुचकामी ठरेल असे परखड मत बाबासाहेबांनी मांडले होते.भारतातील सरंजामी राजकारण्यांना संविधान पटलेलं दिसत नाही.संविधान राबविणारे हात समतावादी असायला हवेत असे मत डॉ.पवार यांनी नोंदविले.लोकशाही म्हणजे केवळ निवडणूक नाही.निवडणूक हा सत्ता संबंध बदलणारा एक मार्ग आहे.जिथे विषमता आहे ती नाकारणे हेच भारतीयांचे कर्तव्य असून लोकशाही एक जिवंत प्रक्रिया व्हावी,अशी अपेक्षा डॉ.प्रकाश पवार यांनी व्यक्त केली.
अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य.डॉ.मकरंद साखळकर यांनी डॉ.आंबेडकरांच्या कार्यावर प्रकाश टाकला.भारतीय लोकशाहीचा पाया रचण्यामध्ये डॉ.आंबेडकरांचे योगदान मोठे आहे असे उद्दगार त्यांनी काढले.समाजातील प्रत्येक घटकाला अधिकार आणि सन्मान प्राप्त करून लोकशाही बळकट करण्याचा विचार डॉ.आंबेडकरांनी मांडला.भारतीय लोकशाही बाबासाहेबांच्या विचार आणि कृतीचा परिणाम आहे,असे विवेचन त्यांनी केले.
या प्रसंगी महाविद्यालयातील कला शाखेच्या उप-प्राचार्या.डॉ.चित्रा गोस्वामी,शास्त्र शाखेच्या उप-प्राचार्या डॉ.अपर्णा कुलकर्णी आणि वाणिज्य शाखेच्या उप-प्राचार्या डॉ.सीमा कदम उपस्थित होत्या.महाविद्यालयातील विविध विषयांचे विभागप्रमुख, प्राध्यापक,शिक्षकेत्तर वर्ग तसेच विद्यार्थी आणि रत्नागिरी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे निवेदन आणि आभारप्रदर्शन प्रा.तृप्ती धामणस्कर यांनी केले.