कोकणातील तारांकित मानांकित अशा गोगटे-जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त),रत्नागिरी यांचा पदवीदान समारंभ दिनांक ३ एप्रिल २०२५ रोजी महाविद्यालयाच्या ज.शं.केळकर सभागृहात थाटात संपन्न झाला.महाविद्यालयास स्वायत्त दर्जा प्राप्त झाल्यानंतरचा हा पहिलाच पदवीदान समारंभ होता.
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे मा.उपकार्याध्यक्ष.ॲड.विजयराव साखळकर,मा.सचिव.श्री.सतिश शेवडे, मा.सहसचिव.श्री.श्रीकांत दूदगीकर आणि नियामक मंडळाचे सदस्य डॉ.चंद्रशेखर केळकर या मान्यवरांच्या उपस्थितीत मार्च-एप्रिल २०२४ मध्ये पार पडलेल्या परीक्षेत यश संपादन करणाऱ्या ४० विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात पदवींचे वितरण करण्यात आले.या प्रसंगी महाविद्यालयाचे परीक्षा नियंत्रक डॉ.विवेक भिडे यांनी मान्यवरांचे स्वागत आणि कार्यक्रमाचे प्रास्तविक केले. आपल्या प्रास्तविकात त्यांनी एकूण १०९२ पैकी ९७१ विद्यार्थ्यांना पदवी दिली जाणार असल्याचे सांगितले.
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य.डॉ.मकरंद साखळकर यांनी महाविद्यालयाच्या विविध क्षेत्रातील यशस्वीतेचा पट मान्यवरांसमोर मांडला.परीक्षा सुरळीतपणे पार पाडल्याबद्दल आणि वेळेत निकाल लावल्याबद्दल परीक्षा मंडळाचे कौतुक केले.विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ.साखळकर म्हणाले की,पदवी संपादन हा विद्यार्थ्याच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा असतो.सांस्कृतिक,क्रीडा अशा विविध स्पर्धेतील आपल्या यशाची महाविद्यालयाच्या इतिहासात नोंद होईल.अनुभवातून आलेले ज्ञान स्मरणात असू द्या.आपले ध्येय निश्चित करा,प्रयत्न करा,नीतिमूल्ये जपा तर यशाच्या शिखरावर पोहोचाल.भविष्यात ज्या ठिकाणी जाल त्या ठिकाणी उत्तम काम करा,महाविद्यालयाचे,देशाचे नाव करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
रत्नागिरी एजुकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे सदस्य डॉ.चंद्रशेखर केळकर यांनी पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.आपल्या यशात योगदान देणारे आई-वडील,शिक्षक यांच्याविषयी कृतज्ञ असावे अशी अपेक्षा त्यांनी पदवीप्राप्त विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली.
आपल्या अध्यक्षीय मनोगतातून ॲड.विजयराव साखळकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.ते म्हणाले की,तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त कष्ट केले म्हणून तुम्ही पदवी प्राप्त केली.यापेक्षा आणखी चांगले करा कारण यशाला मर्यादा नसते.भविष्यात आई-वडील आणि गुरुजन यांच्याविषयी कृतज्ञ आणि वंदनीय असावे.विद्यार्थ्यांच्या यशात योगदान देणाऱ्या सर्व प्राध्यापकांचे त्यांनी अभिनंदन केले.
या कार्यक्रमप्रसंगी पीएच.डी प्राप्त विद्यार्थिनी डॉ.सरिता उचगावकर (गोवा),पदव्युत्तर स्तरावरील संस्कृत विषयाची विद्यार्थिनी प्रज्ञा भट आणि पदवी स्तरावरील विद्यार्थिनी स्वरदा केळकर यांनी आपल्या मनोगतातून महाविद्यालयाविषयी कृतज्ञता व्यक्त केली.या प्रसंगी महाविद्यालयाचे प्रशासकीय उप-प्राचार्य.डॉ.सुरेंद्र ठाकूरदेसाई तसेच कला शाखेच्या उप-प्राचार्या.डॉ.चित्रा गोस्वामी,शास्त्र शाखेच्या उप-प्राचार्या डॉ.अपर्णा कुलकर्णी आणि वाणिज्य शाखेच्या उप-प्राचार्या डॉ.सीमा कदम उपस्थित होत्या.महाविद्यालयातील विविध विषयांचे विभागप्रमुख, प्राध्यापक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे निवेदन आणि आभारप्रदर्शन डॉ.मेघना म्हाद्ये यांनी केले.