gogate-college-autonomous-updated-logo

‘लोकमान्यांनी संघटीत समाजमन घडविले’ – गजानन पळसूलेदेसाई

दि. १ ऑगस्ट २०२४ रोजी लोकमान्य टिळक जयंतीनिम्मित गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी येथे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. कोकणातील नामवंत वक्ते श्री. गजानन पळसुलेदेसाई यांनी ‘लोकमान्यांचा सामाजिक व सांस्कृतिक दृष्टीकोन’ या विषयावर आपले विचार मांडले. आज प्रचार, प्रसारमाध्यमांच्या काळात पदव्या, उपाध्या स्वस्त झाल्या आहेत परंतु असा काळ नसतानाही टिळक लोकमान्य झाले ते लोकांमधून हे वास्तव त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडले. भारतभूमीच्या उद्धारासाठी ब्रिटीशांचे राज्य उलथून टाकणे टिळकांचे उद्दिष्ट्य होते. परकीय सत्ता उलथून टाकण्यासाठी लोकमान्यांनी संघटीत समाजमन घडविले. त्यांनी समूहमनाला साद घातली, असे ते म्हणाले.

लोक गणेश उत्सवात भक्तिभावाने एकत्र येतात, हे लोकमान्यांनी हेरले. गणपतीच्या लोक आस्थेला लोकमान्यांनी सार्वजनिक केला. लोकांना एकत्र आणून त्यांना भूमिका घ्यायला लावण्याचे काम त्यांनी केले. आपण ब्रिटीश सत्तेविरुद्ध लढू शकतो हे धारिष्ट्य त्यांनी घडविले स्वदेशी, स्वराज्य, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार ही चतु:सूत्री लोकमान्यांनी देशवासियांना दिली. नेताजी सुभाषचंद्र बोस, चंद्रशेखर आझाद ,चाफेकर हे लोकमान्यांच्या विचाराने प्रेरित होते, याचे अनेक दाखले त्यांनी दिले.

लोकमान्यांना नामोहरम करण्यासाठी ताईमहाराज प्रकरण पुढे आणले. लोकमान्य स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते होते, त्यांनी बाल विवाहास विरोध केला. राज्यसत्तेला अडसर म्हणून त्यांना तुरुंगवास झाला त्यावेळी बॅरिष्टर जीना त्यांचे वकील होते. स्वतःच्या मुलास चप्पल व्यवसाय करायला सांगणारे लोकमान्य आत्मनिर्भरतेचा खरा पाया घालणारे होते असे अनेक सामाजिक सांस्कृतिक पैलू त्यांनी आपल्या भाषणातून श्रोत्यांसमोर मांडले. सामाजिकता आणि सांस्कृतिकता यांचा संगम लोकमान्यांनी घातला अशी सूत्रबद्ध मांडणी त्यांनी केली.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी लोकमान्य गुणवैशिष्ट्यांवर प्रकाश टाकला. स्वातंत्र्याची ज्योत पेटवण्याचे काम लोकमान्य टिळकांनी केले. त्यांनी राजकारण, समाजकारण, धर्म, शिक्षण या क्षेत्रात कार्य केले. गणेश उत्सव, शिवजयंती उत्सव यामागे राष्ट्रीय एकता निर्माण करणे त्यांचे उद्दिष्ट होते. लोकमान्य टिळक हे प्रभावी पत्रकार, कुशलशिक्षक, द्रष्टये समाजसुधारक होते. स्वाभिमान, कर्तव्यपरायणता, समाजाभिमुखता ही त्यांची गुणवैशिष्ट्ये होती; असे ते म्हणाले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस मान्यवरांकडून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये, विज्ञान शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी आणि वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्या डॉ. सीमा कदम, समारंभ समिती प्रमुख डॉ. तुळशीदास रोकडे यांची उपस्थिती लाभली. महाविद्यालयातील विविध विभागांचे प्रमुख, प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन डॉ. मेघना म्हादये यांनी केले.

tilak-punyatithi-2
Comments are closed.