gogate-college-autonomous-updated-logo

नागरिकांनी अधिकारांबरोबरच कर्तव्यांची जाण ठेवून त्यांचे पालन केल्यास राष्ट्र प्रगतिपथावर जाईल – प्रविंद बिरादार गोगटे – जोगळेकर महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा

रत्नागिरी : भारतीय नागरिकांच्या जीवनात संविधानाने मूलगामी बदल घडवून आणले आहेत. हे बदल घडवून आणण्याचे श्रेय संविधान निर्मात्यांच्या दूरदृष्टीला द्यावे लागेल. नागरिकांनी संविधानात नमूद केलेल्या मूलभूत अधिकारांबरोबरच मूलभूत कर्तव्यांचीदेखील जाणीव ठेवून त्यांचे पालन केल्यास भारत राष्ट्र निश्चितच प्रगतिपथावर जाईल, असे प्रतिपादन रत्नागिरीचे जिल्हा कोषागार अधिकारी श्री. प्रविंद बिरादार यांनी येथे केले. गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.

र. ए. संस्थेचे गोगटे-जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) आणि श्रीमान भागोजीशेठ कीर विधी महाविद्यालय, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय संविधानाचे अमृतमहोत्सवी वर्ष आणि संविधान दिनानिमित्त श्री. प्रविंद बिरादार यांचे ‘नागरिक आणि राज्यघटना’ या विषयावरील विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना विधी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य ॲड. डॉ. आशिष बर्वे यांनी संविधान दिन साजरा करण्यामागील पार्श्वभूमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान निर्मितीतील योगदान यावर थोडक्यात प्रकाश टाकून संविधान, संविधानाचे अमृतमहोत्सवी वर्ष आणि युवा पिढी यांची एक सांगड घालण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले.

त्यानंतर कला शाखा उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये यांनी विद्यार्थ्यांना राज्यघटनेच्या सरनाम्याविषयी माहिती सांगून सरनाम्याचे सामूहिक वाचन करून घेतले. तसेच आजच्या कार्यक्रमात श्री. प्रविंद बिरादार यांनी राज्यघटनेतील तरतुदी आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील त्यांचा संबंध यांची योग्य पद्धतीने सांगड घातल्याचे नमूद केले.

आपले विचार मांडताना श्री. बिरादार पुढे म्हणाले, भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या देशाचे संविधान असून, संविधानामुळे भारतीय लोकशाही आजपर्यंत टिकून आहे. संविधान हा देशाचा मूलभूत कायदा असून, ते एक जिवंत दस्तावेज आहे. भारतीय संविधान लागू झाल्यापासून बदलत्या देशकाल-परिस्थितीनुसार घटनादुरुस्तीच्या माध्यमातून त्यात आवश्यक आणि अनुरूप बदल करून संविधानाची वाटचाल सुरु आहे. नागरिकांच्या जीवनात संविधानाने मूलगामी बदल घडवून आणले असून, नागरिकांनी आपल्या मूलभूत अधिकारांबरोबरच आपली मूलभूत कर्तव्ये जाणून घेऊन त्यांचे पालन केल्यास स्वत: बरोबरच देशाचीही प्रगती होऊ शकते, असे ते पुढे म्हणाले. आपल्या मनोगतातून त्यांनी संविधानाची मूलभूत वैशिष्ट्ये, नागरिक आणि नागरिकत्वाशी संबंधित तरतुदी, मूलभूत हक्क आणि कर्तव्ये, संविधानाचे योगदान अशा विविध पैलूंवर ओघवत्या शैलीतून प्रकाश टाकला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी विद्यार्थ्यांना संविधान दिनाचे महत्त्व विशद करून महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यकमांची माहिती दिली. आपले विचार मांडताना भारतीय संविधान हे नागरिकांशी संबंधीत महत्त्वाचा दस्ताऐवज असून, एक जबाबदार नागरिक म्हणून आपण संविधान, लोकशाही मूल्यांचे जतन केले पाहिजे. तसेच संविधान निर्मात्यांनी संविधानात अंतर्भूत केलेले स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता ही मूल्ये आणि त्यातील आदर्श यांना अनुसरून वाटचाल केली पाहिजे, असे मत व्यक्त केले.

संविधान दिनाचे औचित्य साधून ग्रंथालयात ग्रंथ आणि पोस्टर्स प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य कार्यक्रमात उपस्थितांना संविधान आणि मसुदा समितीतील कामकाज यावरील माहितीपट दाखविण्यात आला. तर प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनींनी संविधानातील तत्त्वे आणि मूल्यांवर आधारित काढलेली रांगोळी ही या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरली. राज्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी समुदाय सहभाग कार्यक्रमांतर्गत विषय शिक्षक श्री. निलेश पाटील यांच्या मार्गदर्शन आणि नेतृत्वाखाली रत्नागिरीतील शाळांमध्ये, तर कु. निखील आपटे यांच्या नेतृत्वाखाली ‘युथ फॉर भारत’ या व्यासपीठाच्या १८ स्वयंसेवकांनी महाविद्यालयात विद्यार्थांना संविधान दिन, संविधान दिन साजरा करण्यामागील पार्श्वभूमी, भारतीय राज्यघटना निर्मिती या बाबींची माहिती सांगून राज्यघटनेच्या सरनाम्याचे सामूहिक वाचन करून घेतले. त्याचप्रमाणे याच व्यासपीठाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेत सुमारे ४७६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

याप्रसंगी व्यासपीठावर विधी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य ॲड. डॉ.आशिष बर्वे, कला शाखा उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये, राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. नीलेश पाटील आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात दोन्ही महाविद्यालयातील प्राध्यापक, आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरिता ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे, शिक्षक, ग्रंथालयीन आणि कार्यालयीन कर्मचारी, सेवक वर्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रोहित देव यांनी, तर आभारप्रदर्शन प्रा. नीलेश पाटील यांनी केले.

 

संविधान दिन कार्यक्रम ग्रंथप्रदर्शन संविधान दिन कार्यक्रम व्याख्यान
Comments are closed.