महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र महाविद्यालय, बारामती यांच्या विद्यमाने करिअर संसदेचे तिसरे राज्यस्तरीय अधिवेशन दि. ३ ते ७ जानेवारी २०२६ या कालावधीत बारामती येथे संपन्न झाला. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिला सबलीकरणाचा दीपस्तंभ उभा केला. त्यांचा वारसा अविरतपणे चालवून बदलत्या शैक्षणिक, सामाजिक, औद्योगिक आणि सांस्कृतिक प्रवाहाला अनुसरून समाजाच्या सर्वांगीण विकासामध्ये भरीव कामगिरी केलेल्या राज्यातील १९ महिलांना करिअर कट्टाच्यावतीने ‘आधुनिक सावित्री २०२६’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातून गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या (स्वायत्त) बी.एम.एस. विभागाच्या प्रमुख डॉ. अश्विनी देवस्थळी यांनाही हा मानाचा पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.
सदर पुरस्कार वितरण सोहळ्यास राज्याच्या उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर, एग्रीकल्चर डेव्हलपमेंटचे अध्यक्ष श्री. राजेंद्र पवार, यशदाचे उपमहासंचालक डॉ. शेखर गायकवाड, इंडियन रेल्वे पर्सोनेल सर्व्हिसेसचे श्री. तुशाबा शिंदे, सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. देविदास वायदंडे, डॉ. नितीन घोरपडे, माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष श्री. यशवंत शितोळे, शारदाबाई पवार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीकुमार महामुनी राज्यस्तरीय करिअर संसदेचे अध्यक्ष डॉ. धनंजय तळवणकर सचिव डॉ. एस. डी. देशभ्रतार आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. अश्विनी देवस्थळी यांना ‘आधुनिक सावित्री पुरस्कार’ प्राप्त झाल्याबद्दल र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, सचिव श्री. सतीशजी शेवडे, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, तीनही विभागांचे उपप्राचार्य, प्राध्यापक आणि कर्मचारी यांनी हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
