gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘अनुवाद’ प्रमाणपत्र अभ्यासवर्गाची सुरुवात

  गोगटे–जोगळेकर महाविद्यालयातील हिंदी विभागाच्यावतीने आयोजित पीएम-उषा अंगार्गत अनुदानीत ३० तासांच्या ‘अनुवाद’ या प्रमाणपत्र अभ्यासवर्गाचे उद्घाटन मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या अभ्यासवर्गाच्या उद्घाटनप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार प्रा. राजेंद्रप्रसाद मसुरकर प्रमुख पाहुणे मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

  उद्घाटनपर भाषणात प्रा. राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी अनुवादाचे बदलते स्वरूप स्पष्ट करताना आजच्या जागतिकीकरणाच्या काळात अनुवाद हे केवळ भाषांतर न राहता विचार, संस्कृती आणि ज्ञानाच्या देवाणघेवाणीचे प्रभावी माध्यम बनले आहे. पत्रकारिता, माध्यमे, प्रशासन, शिक्षण व उद्योग क्षेत्रात अनुवादाच्या व्यापक संधी उपलब्ध असल्याचे अधोरेखित केले.

  या प्रमाणपत्र अभ्यासवर्गाचे समन्वयक प्रा. कृष्णात खांडेकर यांनी अभ्यासवर्गाची संकल्पना, उद्दिष्टे व अभ्यासक्रमाची माहिती दिली. विद्यार्थ्यांमध्ये भाषिक कौशल्यांसोबत व्यावहारिक अनुवाद क्षमता विकसित करणे हा या अभ्यासवर्गाचा मुख्य हेतू असल्याचे त्यांनी नमूद केले.

  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंदी विभागप्रमुख डॉ. शाहू मधाळे होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी हिंदी विभागाच्या उपक्रमांचे महत्त्व सांगून अशा अभ्यासवर्गांमुळे विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख संधी उपलब्ध होतात, असे प्रतिपादन केले.

   महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी विद्यार्थ्यांना या संधीचा करिअरच्या दृष्टीने लाभ घेण्याचे आवाहन केले. या अभ्यासवर्गात हिंदी–मराठी–इंग्रजी भाषांतील साहित्यिक व तांत्रिक अनुवाद, माध्यमांसाठी अनुवाद तसेच प्रत्यक्ष सरावाचा समावेश करण्यात आला आहे. कार्यक्रमास पीएम-उषा समन्वयक डॉ. अपर्णा कुलकर्णी, प्रमाणपत्र कोर्स समन्वयक डॉ. यास्मिन आवटे, कला शाखा उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये, वरिष्ठ प्राध्यापिका डॉ. चित्रा गोस्वामी यांनी शुभेच्छा दिल्या. 

  कार्यक्रमास प्राध्यापक, विद्यार्थी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  प्रा. कृष्णात खांडेकर व आभारप्रदर्शन प्रा. गौरी बोटके यांनी केले. 

Comments are closed.