दरवर्षी दि. १४ ते २८ जानेवारी २०२६ या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येतो. यावर्षी महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये ‘बोलींचा जागर हा कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील कार्यक्रम गोगटे जोगळेकर या स्वायत्त महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये होणार आहे. सकाळी नऊ वाजल्यापासून दुपारी एक वाजेपर्यंत कार्यक्रमांची रेलचेल आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील तीन महत्त्वाच्या बोलींना मंचावर स्थान मिळणार आहे. भंडारी बोली, तिलोरी कुणबी बोली, मुस्लिम कोकणी बोली यांच्या विषयी सखोल मंथन या कार्यक्रमात होणार आहे. सकाळी नऊ वाजता शोभायात्रा आणि ग्रंथदिंडी आयोजित करण्यात येईल. शोभायात्रा संपन्न झाल्यानंतर सकाळी दहा वाजता डॉ. ज. शं. केळकर सेमिनार हॉलमध्ये ‘बोलींचा जागर’ कार्यक्रम सुरू होईल. महाराष्ट्र गीताने मुख्य कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. शासनाची भूमिका कार्यक्रमाच्या समन्वयक श्रीम. आरती वेलींग प्रस्तावित करतील, श्रीम. आरती वेलिंग (पर्यवेक्षक)
श्रीम. मधुरा देसाई (पर्यवेक्षक), श्रीम. कोमल पवार (अनुवादक), श्रीमती. रिया मढये (वरिष्ठ लिपिक) या शासनातर्फे कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. यानंतर वरील तीनही बोलीतील कविता, लोककला, लोकनृत्य असे कलाप्रकार सादर होणार आहेत. यापुढे संबंधित बोलीचे तीन अभ्यासक या बोलींचा उगम आणि विकास, तिची स्वरूप वैशिष्ट्ये, मराठी भाषेतील तिचे महत्त्व, तिचा वापर, सद्यस्थिती आणि तिचे जतन संवर्धन करण्याची गरज याविषयी करणाऱ्या उपाययोजना याविषयी मार्गदर्शनपर भाषण करणार आहेत. भंडारी बोलीसाठी श्री. प्रसाद गवाणकर, तिलोरी कुणबी बोली साठी श्री. अमोल पालये तर मुस्लिम कोकणी बोलीसाठी डॉ. निधी पटवर्धन मार्गदर्शन करतील.
प्रमुख अभ्यागत म्हणून बोली संशोधक प्रा. संतोष गोनबरे उपस्थित राहणार आहेत. यानंतर संबंधित बोली बोलणारे पाच प्रातिनिधिक लोक पाच मिनिटांमध्ये आपल्या बोलीविषयी अनुभव आणि अडचणी कथन करतील. या तीनही बोलीपैकी रत्नागिरी जिल्ह्यातील कोणाला अनुभव कथन करायचे असल्यास गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या डॉ. निधी पटवर्धन यांच्याशी ९४२१४३९६६४ या क्रमांकावर संदेशाद्वारे संपर्क करावा.
कार्यक्रमाची सांगता अध्यक्षीय समारोपाने होणार आहे. या जागर कार्यक्रमास रत्नागिरी जिल्ह्यातील बोली अभ्यासक, भाषाप्रेमी यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले आहे.
