राजीव गांधी महाविद्यालय, वाशी येथे नुकत्याच संपन्न झालेल्या मुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालीन महिला खो-खो स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या महिला संघाने चमकदार कामगिरी करत सुवर्ण पदक पटकावले.
या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या डी. जे. रुपारेल महाविद्यालयाचा सहा गुणांनी पराभव करत विजेतेपद पटकावले. कु. आरती कांबळे, कु. ऐश्वर्या सावंत, कु. धनश्री लाड, कु. सोनिया भोसले, कु. तन्वी कांबळे, कु. जयश्री गार्डी, कु. पल्लवी रांबाडे, कु. अनिता दुर्गवळी, कु. तेजस्विनी गावडे, कु. दिव्या भोरे, कु. रेणुका पवार, कु. नम्रता पवार यांचा विजेत्या संघात समावेश होता.
विजयी संघाला क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे तसेच श्री. पंकज चवंडे यांचे मार्गदर्शन आणि प्रा. ओंकार बने, प्रा. चंद्रकांत घवाळी, सौ. लीना घाडीगावकर तसेच श्री. संदीप तावडे यांचे सहकार्य लाभले.
या स्पर्धेतील पदक विजेत्या व यशस्वी खेळाडूंचे रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष अॅड. विलास पाटणे, कार्यवाह अॅड. प्राची जोशी, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, तीनही विभागांचे उपप्राचार्य, तसेच महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.