रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयात दि. २६ नोव्हेंबर २०१६ रोजी ‘संविधान दिन’ साजरा करण्यात आला. यानिमित्त ग्रंथप्रदर्शन व श्रीमान भागोजी शेठ कीर विधी महाविद्यालयाचे प्राचार्य अॅड. राजशेखर मलुष्टे यांच्या ‘दैनंदिन जीवन आणि संविधान’ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
संविधान दिनाच्या औचित्याने महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात ‘संविधान’ विषयक ग्रंथाचे प्रदर्शन व कै. ज. श. केळकर सभागृहात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, प्रमुख व्याख्याते अॅड. राजशेखर मलुष्टे, कार्यक्रम समिती समन्वयक डॉ. शाहू मधाळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सीमा कदम यांनी केले. स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाच्या त्रिसूत्रीवर आधारलेला, काळाबरोबर बदलण्याची क्षमता असलेला सर्वश्रेष्ठ कायदा म्हणजे संविधान हे सांगतानाच त्यांनी संविधानाच्या निर्मितीप्रक्रियेचा आढावा घेतला.
अॅड. राजशेखर मलुष्टे ‘दैनंदिन जीवन आणि संविधान’ या विषयावर व्याख्यान देताना म्हणाले की ‘भारतीय संविधान हा आपल्याला आपल्या पूर्वजांकडून लाभलेला सर्वात मौल्यवान दागिना आहे. संविधानाच्या मातृरूपी छायेखाली सर्व भारतीयांचे जीवन सुकर झाले आहे.’ यावेळी त्यांनी संविधानाने दिलेल्या सांस्कृतिक, धार्मिक, आर्थिक, शैक्षणिक स्वातंत्र्यासोबतच समानता, अभिव्यक्ती, मानवाधिकार आदी मुलभूत अधिकारांबाबत रोचक उदाहरणाद्वारे माहिती दिली. त्यासोबतच आपले अधिकार वापरताना इतरांचे अधिकार डावलले जाणार नाहीत याचे भान राखण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर म्हणाले कि, संविधानाप्रती आपले प्रेम आणि बांधिलकी व्यक्त करण्याचा तसेच संविधानाचे शिल्पकार डॉ. आंबेडकरांच्या स्मृती जागविण्याचा हा दिवस आहे. घटना समितीच्या २७१ सदस्यांनी तीन वर्षाच्या चर्चेतून ९० हजार हस्तलिखित मसुदा तयार केला. प्रेमबिहारी नारायण रईझरा यांनी त्याचे लेखन तर नंदलाल बोस यांनी त्यातील चिन्हे व प्रतीकांचे रेखांकन केले. घटना समितीचे सल्लागार बी. एन. राव यांनी हा मसुदा तयार केला. तत्कालीन विधीज्ञानी यावर एक वर्ष चर्चा करून २ हजार दुरुस्त्यानंतर हा मसुदा स्विकारण्यात आला. त्यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी तत्कालीन गव्हर्नर जनरल श्री. राजगोपालचारी यांनी भारतास सार्वभौम लोकशाही देश शोषित केले व राज्यघटना अमलात आली. हा इतिहास सांगतानाच डॉ. सुखटणकर यांनी गेल्या ६३ वर्षात केवळ ९४ दुरुस्त्या झाल्याचे नमूद करत घटनाकारांचे द्रष्टेपण अधोरेखित केले.
या कार्यक्रमादरम्यान नवमतदार जागृती अभियान राबवणारे राज्यशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा. प्रभाकर केतकर व त्यांच्या विद्यार्थांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभारप्रदर्शन डॉ. सीमा कदम यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.