रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे आद्य देणगीदार कै. नारायण रघुनाथ गोगटे यांचा स्मृतिदिन दि.८ जुलै रोजी संपन्न झाला.
कै. बाबुराव जोशी आणि कै. मालतीबाई जोशी यांनी रत्नागिरीतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाची सोय करण्यासाठी १९४५ मध्ये शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचे धाडसी पाऊल उचलले. त्यासाठी त्यांनी आपले सर्वस्व अर्पण केले. कै. नारायण रघुनाथ गोगटे तथा नानासाहेब गोगटे यांच्या उदार सढळ आर्थिक मदतीमुळेच हे कार्य शक्य झाले. नानासाहेबांची ही देणगी संस्थेच्या सुरुवातीच्या काळामध्ये फार मोलाची ठरली. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी महाविद्यालयात कै. नारायण रघुनाथ गोगटे यांच्या स्मृतिदिनाचे आयोजन करण्यात येते.
कै. नारायण गोगटे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित त्यांना संबोधित करताना महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या आणि कला शाखा उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये यांनी प्रतिमेला पुष्प वाहून अभिवादन केले. आपल्या मनोगतात डॉ. आठल्ये यांनी कै. नारायण गोगटे यांच्या आठवणींना उजाळा दिला. १९४५ मध्ये मालतीबाई जोशी आणि बाबुराव जोशी यांच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळावे अशा दूरदर्शी विचाराला पाठिंबा म्हणून कै. नारायण गोगटे यांनी त्यावेळी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ महाविद्यालयाला आर्थिक सहाय्य केले होते. त्याचमुळे आज हे महाविद्यालय र. प. गोगटे कला आणि विज्ञान महाविद्यालय या नावाने एक प्रतिष्ठित महाविद्यालय म्हणून उभे आहे. ध्येयवादाने झपाटून काम करणाऱ्या आणि समाजाच्या उन्नतीसाठी स्वप्न बघणाऱ्या कै. बाबुराव जोशी यांच्या पाठीमागे उभे राहणाऱ्यांपैकी कै. नारायण गोगटे यांचे आर्थिक योगदान खूप मोलाचे होते. अशा संवेदनशील आणि दानशूर व्यक्तिमत्त्वाची जाणीव ठेऊन आणि ज्यांच्यामुळे या परिसरामध्ये आपण अभिमानाने वावरतो याची जाण ठेवून ज्ञानदानाचे कार्य करत राहूया असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन समारंभ समिती सदस्या प्रा. तृप्ती धामणस्कर यांनी केले. कार्यक्रमास वाणिज्य शाखा उपप्राचार्या डॉ. सीमा कदम, विज्ञान शाखा उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, परीक्षा समन्वयक डॉ. विवेक भिडे, विविध विभागांचे विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
![]() |
![]() |







Visitors Online : 0