gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘कालिदास दिन’ उत्साहात संपन्न ‘बाळकृष्ण रघुनाथ बापट’ शिष्यवृत्तीचे वितरण

प्रतिवर्षाप्रमाणे १५ जुलै रोजी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या संस्कृत विभागातर्फे ‘कालिदास दिन’ महाविद्यालयाच्या डॉ. ज. शं. केळकर सेमिनार हॉलमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. यंदाच्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे ‘बाळकृष्ण रघुनाथ बापट’ शिष्यवृत्तीचे प्रथमच वितरण करण्यात आले. संस्कृत विभागातील शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला.

कालिदास दिनाच्या निमित्ताने दरवर्षी संस्कृत विभागातील पदव्युत्तर पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना व्याख्यानासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची परंपरा आहे. त्यानुसार यावर्षी संस्कृत विषयात एम.ए. पदवी प्राप्त केलेल्या ओंकार खांडेकर तसेच महाविद्यालयाच्या इतिहास विभागातून पदवी प्राप्त करून सध्या त्याच विभागात ऑनर्सचे शिक्षण घेत असलेल्या ओंकार आठवले यांची व्याख्याने आयोजित करण्यात आली.

प्रथम कु. ओंकार खांडेकर याने ‘विक्रमोर्वशीयम् : एक रसास्वाद’ या विषयावर व्याख्यान देत महाकवी कालिदास विरचित विक्रमोर्वशीयम् या नाटकातील रसात्मकता, कथानक ,आशयवैशिष्ट्ये आणि विविध साहित्यिक पैलूंवर अभ्यासपूर्ण विवेचन केले. त्यानंतर कु. ओंकार आठवले याने ‘कालिदास : काळ व कार्य’ या विषयावर माहितीपूर्ण व्याख्यान देत कविकुलगुरू महाकवी कालिदास यांचे साहित्यिक योगदान, त्यांच्या काळाविषयीचे विविध मतप्रवाह आणि संस्कृत साहित्यातील त्यांचे स्थान यांचा परामर्श घेतला.

यावर्षीपासून कै. बाळकृष्ण रघुनाथ बापट यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अमेरिकास्थित डॉ. ओंकार जोशी यांनी दिलेल्या देणगीतून संस्कृत विभागातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षातील पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यंदा प्रथम वर्षातील किर्ती प्रविण पुजारे, द्वितीय वर्षातील पूर्वश्री विनोद जावडेकर आणि तृतीय वर्षातील स्मितल मधुसूदन बेंडे या विद्यार्थिनींना ‘बाळकृष्ण रघुनाथ बापट शिष्यवृत्ती’ प्रदान करून गौरविण्यात आले. शिष्यवृत्तीचे वितरण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मकरंद साखळकर यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रज्ञा भट यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी अध्यक्ष रूपाने उपस्थितांना मार्गदर्शन केले व कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. कला शाखा उपप्राचार्य संस्कृत विभागप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये यांनी मनोगत व्यक्त करत शिष्यवृत्तीची माहिती दिली. व्याख्यात्यांचे तसेच शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थिनींचे अभिनंदन केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी तृतीय वर्षातील विद्यार्थिनी कु. तेजस्विनी जोशी, कु. पूर्वा खाडिलकर आणि कु. दीप्ती गद्रे यांनी सुमधुर श्लोकगायन सादर केले. कु. मधुश्री वझे हिने धन्यवाद दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृतीय वर्षातील विद्यार्थिनी स्मितल बेंडे हिने केले.

कार्यक्रमास प्राध्यापक, विद्यार्थी आणि संस्कृतप्रेमी उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

Comments are closed.