gogate-college-autonomous-updated-logo

ऑनलाइन फ्रॉडविरुद्ध गोगटे कॉलेजचे २० ‘सायबर वॉरियर्स’ सज्ज; पोलीस निरीक्षक स्मिता सुतार यांचे विशेष मार्गदर्शन

GJC_CS DEPT 23 JULY 26 NEWS

 

क्विक हील फाउंडेशनच्या सहकार्याने उपक्रम; डिजिटल सुरक्षेबाबत जनजागृतीसाठी १६ ‘सायबर वॉरियर्स’ ची निवड

वाढत्या डिजिटल युगात नागरिकांना सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी रत्नागिरी येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. गोगटे जोगळेकर महाविद्यालय आणि प्रसिद्ध ‘क्विक हील फाउंडेशन’ यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराअंतर्गत (MoU) महाविद्यालयात ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा क्लब’ची नुकतीच अधिकृत स्थापना करण्यात आली.

या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले असून, प्रा. केतन जोगळेकर या उपक्रमाचे समन्वयक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.

महाविद्यालयातील सीएस (CS) आणि आयटी (IT) विभागातून अभ्यासू आणि नेतृत्वगुण असलेल्या विद्यार्थ्यांची ‘क्लब ऑफिसर्स’ आणि १६ सायबर वॉरियर्स म्हणून निवड करण्यात आली आहे. असे एकूण २० सायबर वॉरियर्स या उपक्रमात सहभागी होतील

रत्नागिरी सायबर सेलच्या पोलीस निरीक्षक स्मिता सुतार यांचे विशेष मार्गदर्शन

या उपक्रमांतर्गत निवडण्यात आलेल्या २० सायबर वॉरियर्ससाठी एका विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. रत्नागिरी सायबर सेलच्या पोलीस निरीक्षक स्मिता सुतार यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे धडे दिले. या प्रशिक्षणादरम्यान त्यांनी रत्नागिरी शहरातील सायबर गुन्ह्यांशी संबंधित प्रत्यक्ष आकडेवारी (Live Data) आणि घटनांचे विश्लेषण विद्यार्थ्यांसमोर मांडले. या प्रत्यक्ष उदाहरणांमुळे विद्यार्थ्यांना सध्याच्या सायबर धोक्यांची आणि गुन्ह्यांच्या स्वरूपाची सखोल माहिती मिळाली.

समाजात जनजागृतीचा मुख्य उद्देश

हा क्लब आणि निवडलेले १६ सायबर वॉरियर्स आगामी काळात डिजिटल व्यवहार सुरक्षित कसे करावेत, ऑनलाइन सायबर फ्रॉडपासून बचाव कसा करावा आणि डिजिटल सुरक्षेचे नियम कोणते, याविषयी सामान्य नागरिकांमध्ये व विद्यार्थ्यांमध्ये विविध उपक्रमांद्वारे मार्गदर्शन करणार आहेत.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी आणि सर्व प्राध्यापक वर्ग यांनी नवनिर्वाचित सर्व सायबर वॉरियर्सचे कौतुक करून त्यांना पुढील कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

Comments are closed.