gogate-college-autonomous-updated-logo

“लोकमान्य टिळकांचा राष्ट्र हिताचा वारसा पुढे घेऊन जाऊ या” – श्रीम. शिल्पाताई पटवर्धन

गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या वतीने लोकमान्य टिळकांना अभिवादन

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी नेते,भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांना प्रतिवर्षी प्रमाणे गोगटे-जोगेकर महाविद्यालय,रत्नागिरी च्या वतीने दिनांक २३ जुलै २०२६ रोजी टिळक जयंतीनिमित्त लोकमान्य टिळक जन्मस्थान येथे अभिवादन करण्यात आले. उपस्थितांसमोर मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी लोकमान्य टिळकांच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानावर प्रकाश टाकला. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, असा निर्भीड संदेश लोकमान्यांनी भारतीय जनतेला दिला. राष्ट्रवादाची जाज्वल्य प्रेरणा त्यांनी दिली. गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा आग्रह धरला.गणेश उत्सवाला लोकसंघटनेचे स्वरूप दिले. नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लोकमान्यांच्या शैक्षणिक दृष्टीशी सुसंगत आहे.आजच्या दिनी चांगल्या चारित्र्याचा संकल्प करू या असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

उपस्थितांना मार्गदर्शन करताना रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन यांनी टिळकांच्या विचारांचे समकालीन संदर्भ स्पष्ट केले. त्या म्हणाल्या की, आपल्या अस्तित्वाची, गुणांची किंमत न कळल्याने आपण पारतंत्र्यात गेलो. लोकमान्यांनी आपल्या विचार आणि कृतीमधून जनसामान्यांना आपल्या अस्तित्वाची आणि गुणांची ओळख करून दिली. देशहित हाच सर्वात मोठा विचार आहे. देशासाठी आपण काय करू शकतो याचा या दिनी विचार करा, लोकमान्यांचा राष्ट्रहिताचा वारसा घेऊन पुढे जावू या असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करण्यात आले. त्यावेळी संस्कृत विभागातील वैभवी अभिषेक जोशी, पूर्वश्री विनोद जावडेकर, स्मितल मधुसूदन बेंडे, मधुश्री समीर वझे, तेजस्विनी दिनेश जोशी, दीप्ती रणजीत गद्रे, वेदश्री उदय बापट, साक्षी नरेंद्र शेवडे, हिमानी सचिन फाटक या विद्यार्थीनींनी गीतेच्या १२व्या अध्ययाचे पठन केले. प्रा.मकरंद दामले यांनी पारंपरिक वेशात लोकमान्यांची आरती केली.

याप्रसंगी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, संस्थेचे सचिव श्री. सतीशजी शेवडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, कला शाखेच्या उप-प्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये, शास्त्र शाखेच्या उप-प्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे उप-प्राचार्य प्रा. सुनिल गोसावी आणि योजक उद्योग समूहाचे भिडे कुटुंबीय यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक, पुरातत्व विभाग, भिडे आणि जोशी कुटुंबाचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन प्रा. मेघना म्हाद्ये यांनी केले. उद्योजक भिडे परिवाराकडून उपस्थितांसाठी मिठाईचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात समारंभ समिती प्रमुख डॉ. तुळशीदास रोकडे आदींसह शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना विभागाचे स्वयंसेवक, कार्यक्रम अधिकारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments are closed.