gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) येथे उत्साहात साजरा झाला ‘जागतिक कांदळवन संवर्धन दिन’

kandalvan

दि. २६ जुलै हा दिवस ‘जागतिक कांदळवन संवर्धन दिन’ (International Day for the Conservation of the Mangrove Ecosystem) म्हणून जगभर साजरा केला जातो. किनारी जैवविविधतेचे संरक्षण, हवामान बदलाच्या परिणामांना प्रतिबंध, किनारपट्टीची धूप रोखणे तसेच सागरी परिसंस्थेचे संवर्धन यामध्ये कांदळवनांचे असलेले अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेऊन हा दिवस साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), रत्नागिरी येथील वनस्पतीशास्त्र विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान व अनुभवाधारित क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले. दि. २४ जुलै २०२६ रोजी आयोजित व्याख्यानात वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रा. शरद आपटे यांनी “रत्नागिरी जिल्ह्यातील कांदळवनांची विविधता आणि त्यांचे महत्त्व” या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी रत्नागिरी किनारपट्टीवरील कांदळवनांची समृद्ध जैवविविधता, किनारी परिसंस्थेतील त्यांची भूमिका, कार्बन संचयन (Blue Carbon), किनारपट्टीचे धूपापासून संरक्षण, मत्स्यसंपदेचे संवर्धन तसेच हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर कांदळवनांचे संवर्धन का आवश्यक आहे याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली.

या कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व वक्त्यांचा परिचय वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. सोनाली कदम यांनी करून दिला. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी डॉ. विराज चाबके व प्रा. परेश गुरव यांनी विशेष सहकार्य केले. यानंतर दि. २५ जुलै २०२६ रोजी चिंचखरी येथील कांदळवन परिसरात अनुभवाधारित शैक्षणिक क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली. या क्षेत्रभेटीचे मार्गदर्शन प्रा. शरद आपटे यांनी केले. या क्षेत्रभेटीत प्रथम, द्वितीय व तृतीय वर्ष वनस्पतीशास्त्र विभागातील ३० हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या क्षेत्रभेटीदरम्यान डॉ. विराज चाबके व प्रा. प्रियांका शिंदे-अवरे यांचीही उपस्थिती लाभली.

क्षेत्र भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी रत्नागिरी परिसरातील विविध कांदळवन वनस्पतींचे प्रत्यक्ष निरीक्षण करून त्यांची वैशिष्ट्ये, पर्यावरणीय महत्त्व आणि संवर्धनाची गरज जाणून घेतली. यामध्ये काळा कांदळ (Avicennia marina), पांढरा कांदळ (Avicennia officinalis), लाल कांदळ (Rhizophora mucronata), चिपी (Sonneratia apetala), गेवा (Excoecaria agallocha), करंजी (Lumnitzera racemosa) तसेच खारकाटेरी (Acanthus ilicifolius) या प्रमुख कांदळवन प्रजातींचे निरीक्षण करण्यात आले. विद्यार्थ्यांना या वनस्पतींमधील क्षार सहन करण्याची क्षमता, श्वसनमुळे (Pneumatophores), आधारमुळे (Stilt Roots), बियांचे झाडावरच अंकुरण (Vivipary), भरती-ओहोटीशी जुळवून घेण्याची क्षमता तसेच किनारी परिसंस्थेच्या संरक्षणातील त्यांचे महत्त्व प्रत्यक्ष दाखवून सांगण्यात आले. याशिवाय कांदळवन परिसरातील इतर जीवसृष्टीचे निरीक्षण करून विद्यार्थ्यांना कांदळवन परिसंस्थेतील परस्परसंबंध समजावून सांगण्यात आले.या व्याख्यान व अनुभवाधारित क्षेत्रभेटीमुळे विद्यार्थ्यांना कांदळवन परिसंस्थेचे वैज्ञानिक महत्त्व, जैवविविधता संवर्धनातील भूमिका, हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर त्यांची आवश्यकता आणि पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी प्रत्यक्ष अनुभवातून समजली. जागतिक कांदळवन संवर्धन दिनानिमित्त आयोजित या उपक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Comments are closed.