gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या ‘झेप’ महोत्सवांतर्गत क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन संपन्न

GJC ZEP Sports

महाविद्यालयातील तरुणांच्या विविध कलागुणांना आणि क्रीडा कौशल्यांना प्रोत्साहन देणाऱ्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या ‘झेप-२०१६’ सांस्कृतिक आणि क्रीडा महोत्सवाला प्रारंभ झाला आहे.

महाविद्यालयाच्या जवाहर क्रीडांगणावर सकाळी ०९.०० वाजता बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यस्थापक श्री. प्रदीप भाटकर यांच्या शुभ हस्ते क्रीडा महोत्सवाचा उद्घाटन सोहोळा संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या उपकार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, सहकार्यवाह श्री. नरेंद्र पाटील, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. अशोक पाटील, श्री. उल्हास लांजेकर, जिल्हा अॅथलेटिक्स व खो-खो असोसिएशनचे सेक्रेटरी श्री. संदीप तावडे, उद्योजिका सौ. ममता नलावडे, विद्यार्थी प्रतिनिधी श्री. जयदीप परांजपे, विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचारी उपस्थित होते.

महोत्सवातील तीन दिवसांत कला, वाणिज्य व विज्ञान शाखांचे सांघिक व वैयक्तिक संघ मैदानी आणि इनडोअर स्पर्धांमध्ये सहभागी होऊन विविध विजेतेपदांसाठी स्पर्धा करणार आहेत. मुंबई विद्यापीठामध्ये क्रीडा क्षेत्रात अग्रस्थानी असलेल्या महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाने विविध क्रीडा प्रकारांमध्ये विद्यार्थ्याचे कौशल्य आजमावून उत्तम नैपुण्यप्राप्त विद्यार्थ्याची निवड करून सर्वसाधारण विजेतेपद निश्चित करण्याचे ठरवले आहे. यावर्षी प्रथमच गोगटे जोगळेकर क्रिकेट प्रीमियर स्पर्धा घेण्यात आली. सदर स्पर्धेत मुलांचे २४ तर मुलींचे ०८ संघ सहभागी झाले. संपूर्ण स्पर्धेत २२०० दिद्यार्थी सहभागी होत आहेत.

विजेत्या संघातील खेळाडूंना सुवर्ण, रौप्य आणि कास्य पदके महाविद्यालयातर्फे प्रदान करण्यात येणार आहेत. विविध क्रीडाप्रकारात विजेत्या खेळाडूंना बक्षीस वितरण समारंभात मान्यवरांच्या हस्ते पदके प्रदान केली जाणार आहेत.

दरवर्षीप्रमाणेच जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थांनी मैदानी तसेच इनडोअर क्रीडाप्रकारात भाग घ्यावा अशाप्रकारे या क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या क्रीडामहोत्सवाकरिता सर्व मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Comments are closed.