gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या ‘विशेष निवासी शिबिराचा’ मौजे निरूळ येथे प्रारंभ

Nirul NSS Camp

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या दि. २५ ते ३१ डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या विशेष निवासी शिबिराचे उद्घाटन मौजे निरूळ ता. रत्नागिरी येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. रत्नागिरी जिल्हा परिषदेचे सदस्य श्री. उदयजी बने यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले तर उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर हे होते.

आपल्या उद्घाटनपर मार्गदर्शनात श्री. उदयजी बने यांनी ग्राम विकासाचे विविध पैलू उलगडून सांगितले. सुशिक्षित, संस्कारित युवा पिढीबरोबरच सुधृढ युवा शक्तीची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. शिक्षण, आरोग्य, कौशल्य अशा मानव विकासाच्या पैलूंवर त्यांनी प्रकाश टाकला.

अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी कुशल भारत आणि रोकड विरहित अर्थव्यवस्थेच्या संकल्पनेवर प्रकाश टाकला. लहान लहान कौशल्य प्राप्त करून आपण आपल्या दैनंदिन गरजा रोकड विरहित कशा करू शकतो या विषयी मार्गदर्शन केले. यापुढील काळात आरोग्य यासारख्या व्यापक विषयाला केंद्रस्थानी ठेऊन महाविद्यालय आणि परिसरात काम करण्याची अपेक्षा व्यक्त केली. समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत विकास योजना पोहचविण्याचे कार्य विद्यार्थी दशेपासून केले तर देशाच्या सुशासानासाठी लागणारे पारदर्शक उत्तरदायी नेतृत्व अशा संस्कारशिबिरातून घडेल; त्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना हे एक उत्तम व्यासपीठ आहे असे ते म्हणाले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेस पुष्पार्पण करून या विशेष निवासी शिबिराचे उद्घाटन संपन्न झाले. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या कार्यक्रमाधिकारी डॉ. सोनाली कदम यांनी प्रस्ताविक केले. प्रा. मो. दानिश गनी यांनी आभारप्रदर्शन तर प्रा. शिवाजी उकरंडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

या कार्यक्रमासाठी निरूळ गावच्या सरपंच सौ. प्रेरणाताई पांचाळ, उपसरपंच श्री. राजेंद्र बने, सर्व ग्रामपंचायत सदस्य, विविध मंडळाचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ आणि महाविद्यालयीन विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Comments are closed.