मुंबई विद्यापीठाच्या स्टुडन्ट डेव्हलपमेंट विभागाकडून प्रतिवर्षी ‘आविष्कार संशोधन स्पर्धेचे’ आयोजन केले जाते. आविष्कार संशोधन स्पर्धेचे हे २०वे वर्ष आहे. यामध्ये मुंबई विद्यापीठाच्या परिक्षेत्रात येणाऱ्या विद्यापीठातील विविध विभागांमधील, तसेच त्यांचाशी सलग्न असणाऱ्या ८०० पेक्षा अधिक महाविद्यालयातील आणि संस्थांमधील अध्ययन करणारे विद्यार्थी सहभागी होत असतात. सदर स्पर्धा १२ झोन मध्ये घेतली जाते आणि त्यातून निवडक शोध प्रकल्प विद्यापीठ फेरीसाठी निवडले जातात. पदवी, पदव्युत्तर आणि पीएचडी संशोधन करणारे विद्यार्थीही यात सहभाग घेऊ शकतात. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये संशोधकवृत्ती निर्माण करणे आणि समाजोपयोगी संशोधन करणे या दृष्टीने या आविष्कार संशोधन स्पर्धेचे आयोजन केले जाते.
रत्नागिरी झोनची स्पर्धा ज्ञानदीप कॉलेज, खेड येथे संपन्न झाली. संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातून विविध महाविद्यालयातील संशोधन प्रकल्प या ठिकाणी सादर केले गेले. तज्ज्ञ परीक्षकांकडून या प्रकल्पाचे परीक्षण करण्यात आले. त्यातून विद्यापीठ फेरीसाठी २१ संशोधन प्रकल्पाची निवड झाली. त्यातील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे ८ प्रकल्प हे विद्यापीठ फेरीसाठी निवडले गेले. यामध्ये कला शाखेचे दोन, वाणिज्य शाखेचा एक आणि विज्ञान शाखेचे पाच संशोधन प्रकल्प निवडले गेले. या स्पर्धेत जिल्हास्तरावर गोगटे जोगळेकर महाविद्यालयास घवघवीत यश प्राप्त झाले. या वर्षी मुंबई विद्यापीठाच्या आविष्कार संशोधन स्पर्धेत सलग चौथ्यांदा रत्नागिरी विभागाचे विजेतेपद प्राप्त करण्याचा बहुमान गोगटे जोगळेकर महाविद्यालयाला प्राप्त झाला आहे.
सदर स्पर्धेत सुयश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह श्री. सतीशजी शेवडे, सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दुदगीकर, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, वाणिज्य शाखा उपप्राचार्या डॉ. सीमा कदम, विज्ञान शाखा उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, कला शाखा उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये आणि महाविद्यालयातील संशोधन विभागाचे समन्वयक डॉ. (सी.ए.) अजिंक्य राजीव पिलणकर यांनी हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
![]() |

