गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘झेप युवामहोत्सव- २०२२’ अंतर्गत तरुणाईसाठी विविध सांस्कृतिक, कलाकौशल्ये इ. अनेक कार्यक्रम आणि विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या युवामहोत्सवाचा आज तिसरा दिवस असून महाविद्यालयाच्या कै. ज. वा. तथा बाबुराव जोशी ग्रंथालयाच्यावतीने युवा पिढीला करिअरच्या संधी म्हणून स्पर्धा परीक्षांची तयारी आणि जर व्यावसायिक व्हायचे असेल तर व्यवसाय मार्गदर्शनविषयक उपयुक्त पुस्तकांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. सदर ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन दै. लोकमतच्या उपसंपादक, श्रीम. मेहरून नाकाडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. याप्रसंगी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी, कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी, झेपचे समन्वयक आणि सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. आनंद आंबेकर, ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे, प्रा. सचिन सनगरे, प्रा. मंगेश भोसले, प्रा. कृष्णात खांडेकर, डॉ. स्वामीनाथन भट्टार तसेच शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक आणि महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री. ब्रिजेश साळवी, श्री. कैलास चव्हाण, श्री. गुरु नांदगावकर, श्री. गजेंद्र पाथरे, श्री. नदीम काझी, श्री. आशिष कांबळे, विद्यार्थी मंडळाचा सचिव कु.यश सुर्वे उपस्थित होते.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची त्यांच्या महाविद्यालयीन परीक्षेची तयारी करता करताच स्पर्धा परीक्षांकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टीकोन तयार व्हावा हा प्रमुख उद्देश तसेच विविध व्यवसाय विषयक मार्गदर्शन करणारे वाचन साहित्य एकत्र उपलब्ध करून झेप युवा महोत्सवात विद्यार्थ्याभिमुख उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या ग्रंथ प्रदर्शनाला प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी विशेष प्रोत्साहन देऊन शुभेच्छा व्यक्त केल्या. तसेच या ग्रंथ प्रदर्शनाला तरुणाईचा उत्तम प्रतिसाद लाभला. मान्यवरांचे स्वागत एफ. वाय. बी. कॉम.च्या कु. अनन्या वाकडे हिने गुलाबपुष्प देऊन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहा. ग्रंथपाल श्री. उत्पल वाकडे यांनी तर आभारप्रदर्शन एम. ए. ची विद्यार्थिनी कु. शुभराणी होरंबे हिने केले. यावेळी ग्रंथालय कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.