दि. २३ फेब्रूवारी २०२६ रोजी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील सामाजिक शास्त्र मंडळाच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. श्री. शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावती येथील वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. दिनेश खेडकर यांना निमंत्रित करण्यात आले होते. ‘शिक्षक गतिशीलता: वैयक्तिक उत्क्रांती आणि व्यावसाईक क्रांती’ या विषयावर त्यांनी आपले विचार मांडले.
डॉ. खेडकर यांनी आपल्या व्याख्यानाची सुरवात उच्च शिक्षणाच्या वास्तवाची चिकित्सा करत केली. काळाच्या ओघात शिक्षक म्हणून भूमिका बजावताना अध्यापनशास्त्रीय बदल, नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. विकसनशील भारताकडून विकसित भारताकडे जाण्याच्या संकल्पाचा आशय त्यांनी श्रोत्यांसमोर मांडला.विकसित भारतासाठी आवश्यक कृती कार्यक्रम मांडताना उद्योगांना लागणारे कुशल मनुष्यबळ उच्च शिक्षणातून मिळावे ही धोरणकर्त्यांची अपेक्षा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात कशी प्रतिबिंबित झाली आहे हे त्यांनी अधोरेखित केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातून नव्याने पुढे आलेल्या ऑन जॉब ट्रेनिंग मुळे महाविद्यालय आणि उद्योग यांच्यामध्ये अतूट नाते निर्माण होईल. ऑन जॉब ट्रेनिंग घेणे महाविद्यालयीन विद्यार्थ्यास जसे बंधनकारक आहे तशी ऑन जॉब ट्रेनिंग देण्याची व्यवस्था उद्योगांनी उभा करणे गरजेचे आहे तरच अपेक्षित यश मिळेल अशी अशा त्यांनी व्यक्त केली.
उद्योगांना लागणारे आवश्यक कुशल मनुष्यबळ पुरविण्यास महाविद्यालये सक्षम झाली तर सामाजिक जबाबदारीसाठी असलेला उद्योगांकडे असलेला नफ्यातील राखीव निधी अर्थात सीएसआर महाविद्यालयास वेगवेगळ्या उद्देशासाठी मागता येईल त्यामुळे महाविद्यालयाच्या विकासात भविष्यात सीएसआरची भूमिका महत्त्वाची आहे,असे त्यांनी स्पष्ट केले.
उद्योगांना सामाजिक जबाबदारीसाठी खर्चावा लागणारा राखीव निधी महाविद्यालयाने मिळविण्यासाठी महाविद्यालयाने काय करावे याविषयी मार्गदर्शन करताना त्यांनी महाराष्ट्रातील नामवंत उद्योग आणि त्यांचा सीएसआर यावर त्यांनी प्रकाश टाकला.लिंगभाव समानता,पर्यावरणीय शाश्वतता,ग्रामीण विकास प्रकल्प, आरोग्य, स्वच्छता, तंत्रज्ञान विकास, आपत्ती व्यवस्थापन आणि संशोधन या क्षेत्रात महाविद्यालयाने लक्ष केंद्रित करावे असे ते म्हणाले. जर संशोधन ज्ञाननिर्मिती करत असेल तर सीएसआर ज्ञान गतिशील करते आणि महाविद्यालयाने या गतिशील ज्ञानाचा उपयोग अनुदान आकर्षित करण्यासाठी केला पाहिजे. सीएसआर केवळ पैसा नाही,दान नाही तर संधी आहे ती घेण्यासाठीची सक्षमता महाविद्यालयाने मिळविली पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सीएसआर मिळविण्यासाठीचे प्रस्ताव नामंजूर का होतात हे सांगताना त्यांनी अर्ज, त्यातील तांत्रिक बाबी, भाषा, जबाबदारी, जोखीम, पारदर्शकता या बाबी त्यांनी समजावून सांगितल्या. प्रस्ताव तयार करताना समस्यासूत्रण, मुल्यांकनाची गरज, स्मार्ट ध्येये, निर्धारित लाभार्थी, प्रकल्प कालावधी आणि त्याचे टप्पे, आर्थिक अंदाजपत्रक, अपेक्षित फलिते, व्यवस्थापन व नियंत्रण, शाश्वतता, दृश्यमानता या घटकांवर भर देणे आवश्यक आहे हे त्यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, प्रशासकीय उप-प्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये यांनी कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना कार्यक्रम विषयाची प्रस्तुतता अधोरेखीत केली, यावेळी शास्त्र शाखेच्या उपप्राचार्या डॉ.अपर्णा कुलकर्णी, वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्य डॉ. सीमा कदम आणि सामाजिक शास्त्र मंडळाचे समन्वयक डॉ. तुळशीदास रोकडे उपस्थित होते. या कार्यक्रमास महाविद्यालयातील विविध विभागांचे प्रमुख, प्राध्यापक, पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन,अतिथी परिचय आणि प्रास्तविक डॉ. शिवाजी उकरंडे यांनी केले तर प्रा. निलेश पाटील यांनी आभार मानले.
