आयुष्यात यशस्वी होण्यासाठी वेळेचे नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी कोणत्या गोष्टींचा त्याग करायचा आणि कोणत्या गोष्टी स्वीकारायच्यायाचे आत्मभान असायला हवे. आपल्याला कशा प्रकारच्या माणसांचा सहवास लाभतो, आपल्या आजूबाजूला कोणत्या प्रकारचे वातावरण आहे यावर आपला जीवन प्रवास अवलंबून असतो. समृद्धवातावरण, समृद्ध मित्रमंडळ आपला जीवन प्रवास आनंददायी करतात. म्हणूनच जीवनात यशस्वी होण्यासाठी आपल्यातला विद्यार्थी सतत जीवंत ठेवला पाहिजे, असे प्रतिपादन रत्नागिरीतील प्रतिथयश डॉ. अलीमिया परकार यांनी केले. गोगटे– जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), रत्नागिरी, मराठी विभाग, मराठी भाषा संवर्धन पंधरवडयानिमित्ताने आयोजित ‘लेखक आपल्या भेटीला’ या कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
महाविद्यालयाचा मराठी विभाग सातत्याने विद्यार्थीहितैषीकार्यक्रमांचे आयोजन करीत असतो. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. शिवराज गोपाळे यांनी मराठी विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांचा आढावा घेतला. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा दिनाच्या औचित्याने डॉ. अलीमिया परकार लिखित ‘वाटचाल सहा दशकांची’ यापुस्तकासंदर्भात विद्यार्थ्यांनी लेखकाशी संवाद साधला.विविध प्रश्नांच्या माध्यमातून पुस्तकातले अनेक अनुभव डॉ. परकार यांनी कथन केले. प्रश्नोत्तराच्या या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी डॉ. परकार यांचे वैद्यकीय क्षेत्रातील योगदान, विविध क्षेत्रातील त्यांचे कार्य याची माहिती दिली. ‘वाटचाल सहा दशकांची’ हे पुस्तक आपल्या सर्वांना मार्गदर्शक आहे. आपणही आपले अनुभव अशा पद्धतीने व्यक्त करू शकतो. यातूनच लेखन निर्मितीचा आनंद घेता येईल असे त्यांनी आवर्जून नमूद केले . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ज्योती वराळे यांनी केले. प्रा. कृष्णात खांडेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. सदर कार्यक्रमाला महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.