गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागप्रमुख श्री. मिलिंद गोरे दि. ३१ डिसेंबर रोजी प्रदीर्घ सेवेनंतर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. ३६ वर्ष प्राध्यापक म्हणून काम करताना त्यांनी १६ वर्षे विभागप्रमुख म्हणून काम पाहिले. काही काळासाठी त्यांनी विज्ञान शाखेचे उपप्राचार्य पद देखील सांभाळले. सर्व सहकाऱ्यांमध्ये मितभाषी आणि प्रेमळ स्वभावाचे म्हणून प्रसिद्ध असलेल्या डॉ. गोरे यांनी विविध जबाबदाऱ्या देखील तेवढ्याच लीलया पार पाडल्या. एन. सी. सी. आर्मी मधील मेजर हे मानाचं पद त्यांनी भूषविले. लायन्स क्लबने आदर्श शिक्षक पुरस्काराने त्यांना गौरविले आहे. महाविद्यालयामध्ये सह्याद्री माऊंटेनेरिंग क्लब सुरू करण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. बऱ्याच वैज्ञानिक संस्थांचे ते आजीव सभासद आहेत. संशोधनामध्ये देखील त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी महाविद्यालयातर्फे गोरे सरांचा सत्कार केला. कनिष्ठ महाविद्यालय, NCC गटाकडून देखील डॉ. गोरे यांचा सत्कार करण्यात आला. प्राचार्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सरांसोबतचे मैत्रीपूर्ण संबंध विषद केले. केमिस्ट्री मध्ये PhD संशोधन केंद्र सुरु करणे, मृदापरिक्षण प्रयोगशाळा चालू करणे यासाठी सरांनी केलेल्या भरीव योगदानाबद्दल त्यांचे आभार मानले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यानंतर डॉ. गोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी आपल्या आयुष्यातील काही आठवणी सांगताना ते भावविवश झाले. त्यांनी त्यांचा या महाविद्यालयातील ३६ वर्षांचा प्रवास थोडक्यात सांगितला. आपण जेव्हा काम करतो तेव्हा आपल्याला भेटलेली प्रत्येक व्यक्ती आपल्याला काही ना काही शिकवत असते. या कार्यकाळात आपल्या मध्ये एक वेगळे नाते तयार झाले आहे. आता तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा घेवून मी पुढील वाटचाल सुरु करत आहे, असे ते म्हणाले. सर्वांच्या सहकार्यासाठी त्यांनी आभार मानले. डॉ. गोरे यांनी याप्रसंगी महाविद्यालयाला भरीव देणगी देखील दिली.
या कार्यक्रमात एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे, सहकार्यवाह श्रीकांत दुदगीकर, संस्थेचे आजीव सभासद महेश नाईक यांनी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, विज्ञान शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी, वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्या डॉ. सीमा कदम तसेच विविध विभागांचे विभागप्रमुख, महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग आणि कर्मचारी उपस्थित होते. डॉ. मेघना म्हादये यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.