gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात (स्वायत्त) ‘पहिला राष्ट्रीय अंतराळ दिन’ उत्साहात साजरा

राष्ट्रीय अंतराळ दिनाचे औचित्य साधून गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील (स्वायत्त) विज्ञान मंडळाच्या उपक्रमांचे उद्घाटन करण्यात आले

चांद्रयान-३ मोहिमेतील विक्रम लँडरच्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी अवतरणामुळे भारत चंद्रावर उतरणारा चौथा आणि दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश बनला. या यशाची आठवण म्हणून भारताने दि. २३ ऑगस्ट २०२४ पहिला ‘राष्ट्रीय अंतराळ दिन’ साजरा केला. प्रथम अंतराळ वर्षाच्या उत्सवाची संकल्पना “चंद्राला स्पर्श करताना जीवनाला स्पर्श – भारताची अंतराळ गाथा” अशी आहे.

राष्ट्रीय अंतराळ दिनाचे औचित्य साधून गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील (स्वायत्त) विज्ञान मंडळाच्या उपक्रमांचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी, विज्ञान शाखेच्या उपप्राचार्य डॉ. अपर्णा कुलकर्णी आणि प्रमुख अतिथी श्री. सारंग ओक विज्ञान मंडळाच्या समन्वयक प्रा. निशा केळकर, विज्ञान शाखेतील विभाग प्रमुख व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.

उद्घाटनप्रसंगी प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी विज्ञान मंडळातर्फे आयोजित केलेल्या निबंध स्पर्धा आणि सादरीकरण स्पर्धा यांचा आढावा घेत, अशा स्पर्धां द्वारे शालेय विद्यार्थ्यांमध्ये चांद्रयान सारख्या इस्रोच्या मोहिमांबद्दल जागृती निर्माण होते असे प्रतिपादन केले. तसेच शिक्षक व विद्यार्थी यांच्यामध्ये याबद्दल जागृती निर्माण व्हावी यासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन करावे असे सांगितले. प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी यांनी अंतराळ दिवस साजरा करण्यामागचे प्रयोजन विद्यार्थ्यांना सांगितले.

श्री. सारंग ओक संचालक पिंपरी चिंचवड विज्ञान केंद्र यांनी ‘आदित्य एल- 1 आणि आपण’ या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. संवाद साधत असताना त्यांनी आपली सूर्यमाला, सूर्याची रचना याबद्दल सांगितले. तसेच आदित्य एल-1 या मोहिमेची गरज आणि भविष्यामध्ये त्यातून आपल्याला होणारे फायदे याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली.आपल्या भाषणात त्यांनी एखाद्या यशस्वी मोहिमेचा इव्हेंट न करता मोमेंट करावी असे सांगितले.

कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगात विज्ञान मंडळ समन्वयक प्रा. निशा केळकर यांनी अंतराळ दिनानिमित्त विज्ञान मंडळातर्फे घेतल्या गेलेल्या स्पर्धा आणि त्यासाठी शालेय तसेच महाविद्यालयीन स्तरावरून विद्यार्थ्यांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. तसेच सर्व मान्यवर आणि उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वनश्री तांबे आणि प्रास्ताविक प्रा. बाबासाहेब सुतार यांनी केले.

कार्यक्रमास विज्ञान शाखेचे विद्यार्थी आणि प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विज्ञान मंडळाच्या सर्व सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Comments are closed.