तरुणाईचा सळसळता उत्साह, बहारदार कार्यक्रमांना हाऊसफुल गर्दी करून तरुणाईने दिलेली दाद आणि क्षमता संवर्धनासाठी नाविन्यपूर्ण उपक्रमांची जोड अशा वातावरणात गोगटे जोगळेकर महाविद्यालयात झेप-२०१७ ची जल्लोषात सुरवात झाली आहे.
आगळ्या-वेगळ्या पद्धतीने घेण्यात येणाऱ्या गो. जो. महाविद्यालयाच्या ‘झेप’ युवा महोत्सवाचे हे १०वे वर्ष आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देतानाच त्यांना इव्हेंट मॅनेजमेंट आणि नेतृत्वाची संधी निर्माण करून भविष्यातील कलाकार आणि नेतृत्व घडविणाऱ्या या सांस्कृतिक महोत्सवाने स्वतःचे एक वेगळं स्थान निर्माण केले आहे. ‘क्षमता संवर्धन’ या संकल्पनेवर आधारित या झेप युवा महोत्सवाचे आजपर्यंतच्या घोडदौडी तील ‘पुढचं पाऊल’ ठरले आहे.
शुक्रवारी सकाळी पारंपारिक वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी ढोलपथकाच्या गजरात नटराजाची पालखी आणि मानाचा महाराजा करंडक घेऊन शोभायात्रा काढली. सदर शोभायात्रा खातू नाट्यमंदिर येथे विसर्जित झाली. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहोळा संपन्न झाला. याप्रसंगी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह श्री. सतीशजी शेवडे, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, तीनही शाखांचे उपप्राचार्य, प्रा. आनंद आंबेकर, विद्यार्थी प्रतिनिधी तन्मय सावंत उपस्थित होते. यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्य, गायन, वादन अशा विविधरंगी कार्यक्रमांनी झेप महोत्सवा अधिकाधिक रंगतदार होत गेला. तसेच विविध विभागांनी सादर केलेली प्रदर्शने, फन इव्हेंट, फूड स्टोल्स अशा सर्व ठिकाणी तरुणाईची पाऊले वळत होती. तसेच विविध ठिकाणी गझल गायन, कविता वाचन, एकपात्री अभिनय असे कलाप्रकार सादर होत होते आणि दर्दी चाहत्यांची उत्स्फूर्त दाद मिळवत होते. सर्वांची उत्कंठा वाढविणारी फोटोजेनिक फेस, चॉकलेट किंग- क्वीन आणि रोज किंग-क्वीन स्पर्धेला तरुणाईने भरभरून प्रतिसाद दिला.
खातू नाट्य मंदिर येथे संध्याकाळी ग्रुप डान्स आणि सोलो डान्स हे दोन मेगा इव्हेंट पार पडले. या स्पर्धेत नटराज ग्रुपने प्रथम क्रमांक आणि ड्यूएट डान्समद्धे दीक्षा आंबोकर आणि गौरी साबळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. स्पर्धेकरिता सौ. सपना साप्ते-चवंडे आणि श्री. राजेंद्र पवार यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले.