गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या मराठी विभागातर्फे नुकतेच ‘लेखक आपल्या भेटीला’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून ख्यातमान साहित्यिक आणि कोकण मराठी साहित्य परिषेदेचे संस्थापक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक, प्रसिद्ध कवी श्री. महेश केळुस्कर, श्री. शशिकांत तिरोडकर आदी मान्यवरांसह प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये आणि मराठी विभाग प्रमुख प्रा. शिवराज गोपाळे,कोमसापचे कोषाध्यक्षय आणि रत्नागिरीच्या सांस्कृतिक क्षेत्रातील श्री. प्रकाश दळवी व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान श्री. महेश केळुस्कर आणि श्री. शशिकांत तिरोडकर यांनी आपल्या कवितांचे अभिवाचन केले. महाविद्यालयीन जीवनातील तारुण्यसुलभ भावना व्यक्त करणाऱ्या श्री. महेश केळुस्कर यांच्या कवितांना विद्यार्थीवर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तर श्री. शशिकांत तिरोडकर यांच्या ‘पत्र’ या कवितेने विद्यार्थ्यांना भावुक केले .
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांनी महाविद्यालयाशी असणाऱ्या त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त विंदा करंदीकर गोगटे जोगळेकर महाविद्यालयात प्राध्यापक असताना कवी आरती प्रभू यांच्यासह त्यांची घेतलेली भेट, मॅट्रीकच्या परीक्षेचे प्रसंग, लेखक म्हणून प्रस्थापित होईपर्यंत वाट्याला आलेला संघर्ष त्यांनी विद्यार्थ्यांना कथन केला. लेखनाविषयी मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, नव्या लेखकांनी आपल्या अनुभवातून, आपल्या आजूबाजूच्या वास्तव जीवनातले संकेत वापरून लिहायला हवे, जेव्हा असे अस्सल जीवनानुभव तुमच्या लेखनात येतील तेव्हाच खऱ्या अर्थाने ती तुमची नवनिर्मिती असेल.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपप्रसंगी प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. त्याचप्रमाणे महाविद्यालयाची वैभवशाली परंपरा उत्तरोत्तर उन्नत ठेवण्याची ग्वाही दिली. याप्रसंगी अखिल मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवताना पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांनी केलेल्या भाषणाच्या प्रती विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय सुतार याने केले. सदर कार्यक्रमाला महाविद्यालयीन विद्यार्थी आणि प्राध्यापक उपस्थित होते.