स्थानिक, जिल्हास्तर व राज्यस्तरावरील विविध वक्तृत्व स्पर्धांमध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करीत उल्लेखनीय यश प्राप्त केले.
सायली पाटणकर व केतकी जोशी या तृतीय वर्ष विज्ञान विभागाच्या विद्यार्थिनींनी ९ ऑगस्ट २०१६ रोजी लांजा येथे झालेल्या जिल्हास्तरीय कै. नाना वंजारे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सलग दुसर्या वर्षी महाविद्यालयाला सांघिक चषक प्राप्त करून दिला. सायलीने सुविचार – प्रकाशमार्गाचे द्वार या विषयावर बोलून द्वितीय क्रमांक प्राप्त केला तर केतकीने निश्चयाचे बळ…. या विषयावर आपले विचार मांडले.
ओणी, राजापूर येथे १३ ऑगस्ट २०१६ रोजी पहिल्यांदाच झालेल्या अभिवाचन स्पर्धेत तृतीय वर्ष विज्ञान विभागाच्या केतकी जोशी व तेजस्वी सावंतदेसाई या विद्यार्थिनींनी उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केला.
जय हो प्रतिष्ठान रत्नागिरीच्या वतीने दि. २२ ऑगस्ट २०१६ रोजी रत्नागिरीमध्ये घेतल्या गेलेल्या वक्तृत्व स्पर्धेत मेघना बेहेरे या तृतीय वर्ष वाणिज्य शाखेच्या विद्यार्थिनीने तृतीय क्रमांक व चषक प्राप्त केला.
ठाणे येथे दरवर्षी होणाऱ्या व यावर्षी १८ व १९ सप्टेंबर २०१६ रोजी झालेल्या नि. गो. पंडितराव वक्तृत्व स्पर्धेत ब्रेग्झिट एक वादळ या विषयावर बोलून प्रथम वर्ष वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी श्रेयसी शिरसाट हिने द्वितीय क्रमांक प्राप्त करून महाविद्यालयाला चषक प्राप्त करून दिला.
टाईम्स ऑफ इंडिया व फेडरल बँक आयोजित स्पीक फॉर इंडिया या वादविवाद स्पर्धेच्या १४ सप्टेंबर २०१६ रोजी जिल्हास्तरावर रत्नागिरीमध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या केंद्रावर झालेल्या निवड फेरीमध्ये २९ स्पर्धकांमधून प्रिया पेडणेकर (तृतीय वर्ष कला) व श्रेयसी शिरसाट (प्रथम वर्ष वाणिज्य) या विद्यार्थिनींची पुढील फेरीकरिता निवड करण्यात आली. या स्पर्धेमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील स्पर्धक सहभागी झाले होते. त्यामधून पुढील फेरीकरिता निवड झालेल्या ४ स्पर्धकांमध्ये निवडून येण्याचा मान या विद्यार्थिनींनी प्राप्त केला.
स्थानिक, जिल्हास्तर व राज्यस्तरावरील विविध ठिकाणी विद्यार्थांनी मिळविलेल्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमेश कांबळे, विद्यार्थी विकास कक्ष समन्वयक प्रा. उदय बोडस आणि वक्तृत्व व वादविवाद समितीचे समन्वयक प्रा. जयंत अभ्यंकर यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.