gogate-college-autonomous-updated-logo

‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमांतर्गत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाची ‘ग्रंथदिंडी’ उत्साहात साजरी

‘वाचन आहे मनाचे अन्न |वाचनाने होते मन प्रसन्न||’,
‘वाचनाने होते ज्ञानवृद्धी |तीक्ष्ण होते सर्वांची बुद्धी||’,
‘सोडा मोबाईल वाचा पुस्तक |आरोग्य देईल दरवाजावर दस्तक||’,
‘वाचा पुस्तके अपार| ज्ञान मिळेल अपरंपार||’
असे फलक हातात घेऊन, घोषणा देत गोगटे जोगळेकर स्वायत्त महाविद्यालयाचे जवळपास २१० विद्यार्थी मोठ्या उत्साहात ग्रंथदिंडीत सामील झाले होते.

‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमांतर्गत दि. १ जानेवारी ते १५ जानेवारी २०२५ या कालावधीत विविध वाचनविषयक जाणीव जागृतीचे उपक्रम महाविद्यालयात राबविण्यात येत आहेत. या उपक्रमाचा एक भाग म्हणून महाविद्यालयात दि. १३ जानेवारी रोजी ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रंथदिंडी कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. निधी पटवर्धन यांनी केले. प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांच्या हस्ते ग्रंथ पूजन करण्यात आले. त्यांनी विंदा करंदीकर यांची ‘घेता’ या शीर्षकाच्या कवितेचे वाचन केले. याप्रसंगी त्यांनी ‘वाचन वसा घेऊ या’ अशा शुभेच्छा दिल्या.

महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ते जयस्तंभ, नगरपरिषद, लाला कॉम्प्लेक्स, जी. जी. पी. एस. आणि कै. बाबुराव जोशी ग्रंथालयाच्या प्रवेशद्वारापर्यंत ही ग्रंथदिंडी वाजत गाजत मोठ्या दिमाखात काढण्यात आली. लेझीम पथक, ढोल पथकासह पारंपरिक पोशाखात विद्यार्थी सहभागी झाले होते.अत्यंत सुंदर सजवलेल्या पालखीमध्ये भारतीय संस्कृती कोश, भारताचे संविधान, स्वामी स्वरूपानंद लिखित अभंग ज्ञानेश्वरी, शेक्सपियरची नाटके,समग्र विंदा करंदीकर आदी ग्रंथ ठेवण्यात आले होते. ग्रंथदिंडीत विद्यार्थ्यांनी प्रेरणादायी वाचनासंबंधी घोषणा दिल्या आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये वाचनाविषयी जागृती केली. ग्रंथदिंडीचा समारोप कै. बाबुराव जोशी ग्रंथालयापाशी करण्यात आला. ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे यांनी विद्यार्थ्यांना आजच्या दिवशी शक्य तेथे वाचनाविषयी जागृती करा असे आवाहन केले.

या ग्रंथदिंडीत वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्य डॉ. सीमा कदम, ग्रंथालय समितीच्या समन्वयक डॉ. कल्पना आठल्ये, मराठी विभागाचे प्रमुख डॉ. शिवराज गोपाळे, सहायक ग्रंथपाल श्री. उत्पल वाकडे, ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. अतुल पित्रे, इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. वासुदेव आठल्ये, प्रा. दत्तात्रय कांबळे, प्रा. निलेश पाटील तसेच विविध भाषा आणि सामाजिक शास्त्रांचे प्राध्यापक बहुसंख्येने सहभागी झाले होते. एन.सी.सी. विभागाचे प्रा. अरुण यादव व विद्यार्थ्यांचे ग्रंथदिंडीस विशेष सहकार्य लाभले. या संपूर्ण ग्रंथदिंडी कार्यक्रमाचे आयोजन द्वितीय वर्ष कला शाखेतील मराठी विभागाच्या व्यावसायिक कौशल्य अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी केले होते.

Comments are closed.