गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या ‘झेप’ या वार्षिक युवा महोत्सवास प्रारंभ झाला आहे. या निमित्ताने विविध नाविन्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. असाच एक अनोखा‘गुरु शिष्य संवाद’ कार्यक्रम डॉ. ज. शं. केळकर सेमिनार हॉल येथे संपन्न झाला. महाविद्यालयाने आजवर अनेक कलाकार घडवले. आपल्या कलेच्या जोरावर या गुणवंतांनी अवघ्या महाराष्ट्राचे मनोरंजन केले. यामध्ये वैभव मांगले, श्रमेश बेटकर, प्रथमेश शिवलकर, योगेश कुंभार, विदिशा म्हसकर अशा अनेक गुणवान माजी विद्यार्थ्यांची एक परंपरा महाविद्यालयाला लाभली आहे. कला क्षेत्रातील गुरु आणि त्यांचे शिष्य यांचा संवाद या कार्यक्रमात घडवून आणण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे माजी सांस्कृतिक विभाग समन्वयक आणि रसायनशास्त्र विभाग प्रमुख विजयकुमार रानडे हे गुरु आणि सध्याचे सांस्कृतिक विभाग समन्वयक प्रा. आनंद आंबेकर हे शिष्य म्हणून उपस्थित होते. तसेच सहा महिन्यात विक्रमी १०६ प्रयोग झालेल्या ‘यदा कदाचित रिटर्न’ या नाटकातील कलाकार नंदकिशोर जुवेकर आणि रोहित शिवलकर हे प्रा. आनंद आंबेकर यांचे शिष्यही या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
यावेळी संवाद साधताना प्रा. विजयकुमार रानडे म्हणाले, कोकणच्या जीमिनीत नाटक आहे. मात्र त्याला अंकुर फुटावेत यासाठी मुंबई किंवा पुणे गाठावे लागते. ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यांनी येथील नमन-खेळे या लोककलांच्या अभ्यासाची गरज व्यक्त केली. प्रा. आनंद आंबेकर यांनी रानडे सरांच्या कारकिर्दीत त्यांना आलेल्या विविध अनुभवांन उजाळा दिला. रत्नागिरीतून कार्यक्रमांची स्वतंत्र निर्मित होणे काळाची गरज आहे असे सांगून त्यांनी नृत्य आणि गायन या कलांचे कॉन्सर्ट बसविण्याचा आपला मानस व्यक्त केला.
नंदकिशोर जुवेकर म्हणाले, ‘आंबेकर सर म्हणजे वडिलांप्रमाणे माया करणारे आणि प्रसंगी हक्काने कान पकडणारे गुरु आहेत. तर रोहित शिवलकर यांनी आपल्या महाविद्यालयीन जीवनातील एक किस्सा सांगून आंबेकर सरांनी आपल्याला पडेल ते काम करायला शिकवले आणि आज व्यावसायिक नाटक करत असताना या गुणाचा मोठा फायदा होत असल्याचे सांगितले.
सदर कार्यक्रमाचे आयोजन तृतीय वर्ष विज्ञान या वर्गाने केले होते. सूत्रसंचालन सायुजा पटवर्धन हिने केले. कार्यक्रमाच्या संयोजनात प्रा. मधुरा आठवले-दाते आणि प्रा. सीमा वीर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला प्राध्यापक आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.