प्रतिवर्षाप्रमाणे गोगटे जोगळेकर महाविद्यालयात हिंदी विभाग आणि वाङ्मय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदी दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. प्रारंभी विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या विविध विषयावरील हिंदी हस्तिलिखित भित्तिपत्रक ‘राष्ट्रवाणी’चे प्रकाशन केंद्रीय वस्तू व सेवा कर विभाग रत्नागिरीचे अधिकारी मान. अभिषेक पाल यांच्या हस्ते झाले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी ‘प्रशासकीय परीक्षाओं में हिंदी भाषा का बढता महत्व’ या विषयावर त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. अनेक उदाहरणे देत प्रशासकीय परीक्षेमध्ये हिंदी भाषेचे महत्व कसे वाढत चालले आहे याची माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदी विभाग प्रमुख डॉ. शाहू मधाळे यांनी केले तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. चित्रा गोस्वामी यांनी करून दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी देश-विदेशात पसरत चाललेल्या हिंदी भाषेविषयी सविस्तर माहिती दिली.
सूत्रसंचालन कु. सावनी शेंबवनेकर आणि कु. सुनैना आयनारकर यांनी केले. आभारप्रदर्शन प्रा. कृष्णात खांडेकर यांनी केले. कार्यक्रमाला कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये, प्रा. शिवराज गोपाळे, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने आपली उपस्थिती दर्शविली.