‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’ स्पध्रेमध्ये रविवारी झालेल्या रत्नागिरी विभागीय अंतिम फेरीतून गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या ऋषिकेश वैद्य याने महाअंतिम फेरी गाठली आहे. येत्या १७ मार्च रोजी मुंबईत होणाऱ्या महाअंतिम फेरीत ऋषिकेश रत्नागिरी केंद्राचे प्रतिनिधित्व करणार आहे.
या आंतरमहाविद्यालयीन स्पध्रेचे यंदा पाचवे वर्ष असून या वर्षी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्य़ांमधील स्पर्धक गेल्या मंगळवारी आयोजित प्राथमिक फेरीत सहभागी झाले. त्यातून सहा जणांची विभागीय अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली होती. येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई शेटय़े सभागृहात रविवारी (१० मार्च) ही फेरी पार पडली.
त्यामध्ये गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या ऋषिकेश वैद्यने पहिला क्रमांक पटकावत महाअंतिम फेरी गाठण्याचा मान मिळवला, तर कौस्तुभ फाटक (देव-घैसास-कीर महाविद्यालय, रत्नागिरी) याला दुसरा आणि प्रतीक सरकाळे (शरच्चंद्र पवार अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, (खेरवते, ता. चिपळूण) याला तिसरा क्रमांक मिळाला. डीबीजे महाविद्यालयाच्या राजेश्वरी पाटील हिला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
या फेरीसाठी ‘लक्ष्यभेद-नवा पर्याय’, ‘गलीबॉय’चे भवितव्य’, ‘पुढारलेल्यांचे आरक्षण’ आणि ‘खेळातील परके शेजारी’ हे चार विषय स्पर्धकांना देण्यात आले होते. त्यापकी ‘खेळातील परके शेजारी’ या विषयाला कुणीही स्पर्श केला नाही. मात्र सर्वच स्पर्धकांनी उत्तम तयारी करून सादरीकरण केल्याचा अभिप्राय परीक्षकांनी नोंदवला.
‘लोकसत्ता’ वृत्तपत्र समूहाचे सरव्यवस्थापक संजय तेलंगे, उपसरव्यवस्थापक सुरेश बोडस, या फेरीचे परीक्षक डॉ. शरद प्रभुदेसाई आणि सई साने यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार देण्यात आले.