आजच्या आधुनिक युगातही ‘हुंडा’ ही अनिष्ट प्रथा समाजाला कीड लावण्याचं काम करत आहे.ही प्रथा मुळासकट उखडून टाकण्यासाठी आणि हुंडा प्रतिबंधक कायदा १९६१ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आज गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातील विद्यार्थ्यांनी शहराच्या मुख्य चौकात एक हृदयस्पर्शी पथनाट्य सादर केले.
“हुंडा नको गं बाई…” या शीर्षकाखाली सादर करण्यात आलेल्या या पथनाट्यात हुंडा घेणं आणि देणं हे दोन्हीही कायद्याने गुन्हा कसे आहेत, हे प्रकर्षाने मांडण्यात आले. एका मध्यमवर्गीय कुटुंबाची मुलगी लग्नानंतर हुंड्यासाठी होणाऱ्या छळामुळे कशी भरडली जाते आणि शेवटी कायद्याच्या मदतीने ती या संकटातून कशी बाहेर पडते, याचे वास्तववादी चित्रण करण्यात आले.
पथनाट्यादरम्यान विद्यार्थ्यांनी फलकांच्या माध्यमातून ‘हुंडा प्रतिबंधक कायदा १९६१’ मधील महत्त्वाच्या तरतुदींची माहिती दिली:कलम ३:हुंडा घेणे किंवा देणे हा गुन्हा असून, यासाठी किमान ५ वर्षांची कैद आणि १५,००० रुपये दंडाची तरतूद आहे.कलम ४:हुंड्याची मागणी करणे हा सुद्धा तितकाच गंभीर अपराध आहे.
तसेच अन्य कायदे सांगितले व पत्रकांचे वाटप केले.”फक्त कायद्याने बदल होणार नाही, तर समाजाची मानसिकता बदलणे गरजेचे आहे,” असा संदेश या नाटकातून देण्यात आला.कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व नागरिकांनी ‘मी हुंडा घेणार नाही आणि देणार नाही’ अशी सामूहिक शपथ घेतली.
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री.लहू पगडे , राष्टीय सेवा योजना विभाग समन्वयक प्रा. सचिन सनगरे यांचे मार्गदर्शनाखाली हे पथनाट्य तयार करण्यात आले. स्वयंसेवक संचिता खापरे, सानिका साळवी, इशा पालकर, वृषाली कुळ्ये, गुरुराज घाटकर, सेजल सावंत, सार्थक डांगे, अवधूत रेवाळे, आर्यन जमादार, ओमकार कांबळे, मानस कांबळे, रुद्रप्रताप जाधव यांनी यात सहभाग घेतला. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी या पथनाट्य उपक्रमात सहभागी सर्व स्वयंसेवकांचे अभिनंदन करून कौतुक केले.
![]() |

