gogate-college-autonomous-updated-logo

वर्तमानात पाहिलेल्या स्वप्नाचा ध्यास धरणारी स्त्रीच परिपूर्ण होऊ शकते – शिल्पाताई पटवर्धन गोगटे जोगळेकर महाविद्यालयात जागतिक महिला दिन संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात जागतिक महिला दिन संपन्न

‘अनेकदा स्त्रिया भूतकाळात रमतात अन्यथा भविष्याच्या कल्पना रंगवतात. मात्र उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहून त्या स्वप्नांच्या पूर्ततेचा ध्यास जी स्त्री धरते तीच आयुष्यात परिपूर्ण होऊ शकते. स्त्री लौकिकार्थाने सुशिक्षित असली तरच ती प्रगती करू शकते असे नाही तर स्वतःचे सामर्थ्य आणि उणीवा यांची योग्य जाण असणारी कोणतीही स्त्री तिच्या क्षेत्रात नाव कमावू शकते’ असे प्रतिपादन रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा मा. शिल्पाताई पटवर्धन यांनी केले. त्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘जागतिक महिला दिनानिमित्त’ आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात महिला दिनाच्या निमित्ताने महिला विकास कक्ष, विद्यार्थी मंडळ आणि कला शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रातील स्त्रियांच्या भावमुद्रा टिपणारी छायाचित्रण स्पर्धा आणि विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा मा. शिल्पाताई पटवर्धन, महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. यास्मिन आवटे, कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये, महिला विकास कक्षाच्या सदस्या प्रा. अश्विनी देवस्थळी, छायाचित्रण स्पर्धेच्या परीक्षिका सौ. मालती खवळे, श्रीमती सपना देसाई, विद्यार्थी मंडळाचा सचिव संतोष शेलार, सौम्या पै आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. देवस्थळी यांनी केले. यावेळी त्यांनी महिला विकास कक्षाच्या मार्फत महाविद्यालयीन विद्यार्थिनींसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांबद्दल माहिती दिली.

यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना शिल्पाताई पटवर्धन म्हणाल्या, ‘भारतातील स्त्रियांच्या मुक्तीसाठी राजा राममोहन राय, कर्वे, महात्मा फुले यांसारख्या समाजसुधारकांनी लढा दिला आहे याचेही भान स्त्रियांनी ठेवले पाहिजे. स्वतःचे अवमूल्यन न करता स्त्रियांनी आपल्या क्षमता आणि उणीवा यांची पारख करून आपापल्या क्षेत्रात कर्तृत्व गाजविले पाहिजे.’ यावेळी त्यांनी विविध क्षेत्रातील आपले अनुभव कथन करत आयुष्यात यशस्वी होण्यासाठी अंतर्मुख होऊन आत्मपरीक्षण करण्याची गरज व्यक्त केली.

छायाचित्रण स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून उपस्थित सौ. मालती खवळे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, एखाद्या विषयाचे गांभीर्य अधोरेखित करण्याचे सामर्थ्य छायाचित्रात असते. त्यामुळे छायाचित्रण कलेच्या माध्यमातून विविध सामाजिक विषयांना भिडण्याचा विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावा. तर श्रीमती सपना देसाई यांनी छायाचित्रण व्यवसायातील महिलांपुढील आव्हाने आणि संधी यांबाबत माहिती दिली.

अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. यास्मिन आवटे म्हणाल्या की, स्त्रियांनी आपले सामर्थ्य, उणीवा, संधी आणि त्या साध्य करण्यात येणाऱ्या अडचणी यांचे विश्लेषण करून स्वतःच्या आत्म्याशी संवाद साधला पाहिजे. आपण एक स्त्री आहोत असा लिंगाधारित विचार करण्यापेक्षा आपण एक स्वतंत्र व्यक्ती आहोत असा विचार केल्यास आपले ध्येय प्राप्त करण्यापासून स्त्रियांना कुणीही रोखू शकणार नाही. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन डॉ. कल्पना आठल्ये यांनी केले. यावेळी त्यांनी कार्यक्रमाचे व्यवस्थापन करणाऱ्या विद्यार्थी मंडळाच्या सदस्यांचे आणि कला शाखेच्या विद्यार्थी प्रतिनिधींचेही कौतुक केले.

या कार्यक्रमात छायाचित्रण स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यात ग्रामीण छायाचित्रण स्पर्धेत प्रथम पारितोषिक सुनेत्रा पोकडे, द्वितीय पारितोषिक कपिल केळकर, शहरी छायाचित्रण स्पर्धेत प्रथम पारितोषिक निरामय साळवी, द्वितीय पारितोषिक तल्बिया मुल्ला रस्त्यावरील छायाचित्रण स्पर्धेत प्रथम पारितोषिक अफाक मुकादम, द्वितीय पारितोषिक तल्बिया मुल्ला यांनी पटकावले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नारायणी शहाणे हिने केले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापिका आणि र. ए. सोसायटीच्या विविध विद्यालयातील शिक्षिका बहुसंख्येने उपस्थित होत्या.

Comments are closed.