गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या (स्वायत्त) गणित विभागातर्फे दि. १७ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘एस. व्ही. कानिटकर सर स्मृती व्याख्यानमालेचे’ आयोजन करण्यात आले होते. यंदा या व्याख्यानमालेचे हे सातवे वर्ष होते. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या गणित विभागाचे सलग १३ वर्षे विभाग प्रमुख म्हणून पद भूषविलेले आणि महाविद्यालयात ३२ वर्षे प्राध्यापक म्हणून उत्कृष्ट कामकाज केलेले ‘कै. एस. व्ही. कानिटकर सर’ यांच्या स्मरणार्थ दरवर्षी गणित विभाग व्याख्यानमालेचे आयोजन करतो.
आतापर्यंत डॉ. विवेक पाटकर, डॉ. माणिक टेंबे, डॉ. मेधा लिमये, डॉ. हरिहर कुंभोजकर, डॉ. मीरा माईणकर आणि डॉ. गोरोबा खुरपे यांची अनुक्रमे बहुरंगी गणित, गेम थिअरी, शुल्बसूत्रातील भूमिती, मानवी ज्ञानाचे स्वरूप, भूमिती आणि अंकगणित, मानवी जीवनातील गणिताचे स्थान आणि महत्त्व या विषयांवर व्याख्याने झाली.
व्याख्यानमालेचे सातवे पुष्प गुंफण्यासाठी गणित विभागाने प्रा. सलिल सावरकर यांना प्रमुख वक्ते म्हणून निमंत्रित केले होते. प्रा. सावरकर हे उल्हासनगर येथील श्रीमती चांदीबाई हिंमथमल मनसुखानी महाविद्यालयातील गणित विभागात कार्यरत आहेत. प्रा. सावरकर यांनी उपस्थित गणित प्रेमींसमोर “भारतीय गणितातले संख्यादर्शन” या विषयावर अतिशय ओघवत्या वाणीत मार्गदर्शन केले. वैदिक संस्कृती, मध्ययुगीन भारतात लिहिल्या गेलेल्या ग्रंथात संख्या दर्शविण्यासाठी काही विशिष्ट शब्दांचा वापर होत असे; त्याचे स्पष्टीकरण प्रा. सावरकर यांनी अतिशय सोप्या पद्धतीने विविध उदाहरणांचा वापर करून दिले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने गणित विभाग घेत असलेल्या पदवी आणि पदव्युत्तर विभागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला. एम. एस्सी. वर्गातील मुले एक आठवडा तृतीय वर्ष गणित विषयाच्या विद्यार्थ्यांच्या वर्गावर शिकवतात आणि त्यातून दोन उत्कृष्ट शिक्षक निवडले जातात. तसेच तृतीय वर्ष गणित विषयच्या विद्यार्थ्यांची एक परीक्षा घेतली जाते त्यातूनही तीन विद्यार्थ्यांची निवड गुणांच्या माध्यामतून केली जाते. यंदा दोन उत्कृष्ट शिक्षकाचा पुरस्कार कु. स्वाती अंग्रोळकर व कु. नम्रता माने यांना अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. तर बक्षीसपात्र तृतीय वर्ष गणित विषयाच्या विद्यार्थ्यांची नवे अनुक्रमे कु. शिवान कीर, कु. पलाशा सामंत आणि कु. कावेरी जंगम अशी होती.
गोगटे जोगळेकर महाविद्यालायाच्या गणित विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. राजीव सप्रे हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात प्रा. कानिटकर सरांच्या आठवणींना उजाळा दिला. त्याचप्रमाणे गणिताची सर्वसमावेशकता आणि जागतिक एकसारखेपणा याबद्दल विवेचन केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर व्याख्यानमाला यशस्वीपणे संपन्न झाली. प्रमुख वक्त्यांची ओळख प्रा. श्रद्धा सुर्वे आणि गणित विभाग प्रमुख डॉ. दिवाकर करवंजे यांनी तर बक्षीस समारंभाचे सूत्रसंचालन प्रा. गौरी पटवर्धन यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन प्रा. स्पृहा जोशी यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. स्वाती अंग्रोळकर या विद्यार्थिनीने केले.
![]() |
![]() |


