‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमाचे औचित्य साधून गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात ‘लेखक आपल्या भेटीला’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयातील प्राध्यापिका आणि लेखिका डॉ. निधी पटवर्धन यांनी ‘वाचन आणि लेखन’ या विषयावर उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी मराठी विभाग प्रमुख डॉ. शिवराज गोपाळे, प्रा. डी. एस. कांबळे, प्रा. संयुक्ता शेट्ये, प्रा. मधुरा शिंदे आणि ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे यांनी केले. ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमांतर्गत कै. बाबुराव जोशी ग्रंथालयाच्याद्वारे आयोजित केलेल्या विविध वाचनविषयक उपक्रम आणि कार्यक्रमांची माहिती दिली. मानवाच्या मुलभूत गरजांमध्ये वाचन या गरजेचाही समावेश आहे; असे सांगून मान्यवर लेखकांच्या आणि प्रसिद्ध पुस्तकांचे विद्यार्थ्यांनी वाचन केले पाहिजे असे सांगितले.
डॉ. निधी पटवर्धन यांनी ‘वाचन आणि लेखन’ याविषयी बोलताना; वाचनाच्या वाटचालीचा आढावा घेतला. लहानपणी केलेले वाचन, विद्यार्थीदशेत केलेले आणि नंतर केलेले वाचन हळूहळू कसे आनंदी ठरत जाते ते सांगितले. म्हणजे वयानुसार वाचनाची गरज कशी बदलते ते सांगून मुखोद्गत ते मुद्रणकला येईपर्यंतचा लेखनाचा प्रवास विषद केला. रंजनाचे मुख्य साधन पुस्तक हेच आहे; वाचनाला कशाचेही बंधन असत नाही आणि पुस्तके नेहमीच अनुभूती आणि प्रेरणा देतात असे सांगितले. लेखकांना आपण पत्र पाठविली पाहिजेत जेणेकरून आपण त्यांच्याशी संवाद साधू शकतो. ‘वाचन गुरु’ म्हणजे वाचन कसे आणि कोणते करावे हा मंत्र देणारी व्यक्ती भेटणे खूप महत्वाचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. डॉ. आंबेडकर, लोकमान्य टिळक यांना पुस्तके कशी आणि किती प्रिय होती हे त्यांनी विविध विधानांचा आढावा घेऊन सांगितले. अखेर त्यांनी ‘ग्रंथालयाकडे चला पुस्तके आपली वाट पाहत आहेत’ असे विद्यार्थ्यांना सांगून आपल्या वाणीला विराम दिला.
उपस्थित विद्यार्थ्यांनीही या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपले काही वाचन आणि लेखनविषयक प्रश्न डॉ. निधी पटवर्धन यांना विचारले; ज्यांची समर्पक उत्तरेही त्यांनी दिली. या कार्यक्रमाला ग्रंथालय कर्मचारी, वाचक गट, वाङ्मय मंडळ आणि भाषा विभागातील विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन सहायक ग्रंथपाल श्री. उत्पल वाकडे यांनी केले. चहापानानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.