मकरसंक्रांती या दिवसाचे औचित्य साधून ‘भारतीय सण, उत्सव आणि कोकण पर्यटन’ या विषयांवर आधारित ग्रंथांचे प्रदर्शन गोगटे जोगळेकर (स्वायत्त) महाविद्यालयाच्या ग्रंथालयात आयोजित करण्यात आले. या ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्या आणि वाणिज्य विभागाच्या प्रमुख डॉ. सीमा कदम यांच्या शुभहस्ते सरस्वती देवीचे पूजन करून करण्यात आले. याप्रसंगी कला शाखेच्या उपप्राचार्या व संस्कृत विभाग प्रमुख डॉ. कल्पना आठल्ये, उर्दू विभागप्रमुख डॉ. दानिश गनी, ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे इ. मान्यवर उपस्थित होते.
डॉ. सीमा कदम आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या, ‘सण आणि उत्सव हे आपल्या संस्कृतीचा एक महत्वाचा भाग आहेत; म्हणून त्यांना भारतीय संस्कृतीत खूप महत्वाचे स्थान आहे. तसेच कोकणातील पर्यटन ही आर्थिक दृष्ट्या खूप महत्वाची बाब असून कोकणातील संस्कृती, निसर्ग आणि कोकणातील लोककला या निश्चितच आपल्या जमेच्या बाजू आहेत. त्यांचा उपयोग करून आपल्याला प्रगती करता येईल. भविष्यात यादृष्टीने आपण तयार असले पाहिजे; असे सांगून आजचे ग्रंथ प्रदर्शन यादृष्टीने खूप महत्वाचे आहे’ असे प्रतिपादन केले. वाचन संस्कृती सतत प्रयत्न करून आपण सर्वांना जोपासली पाहिजे असे उपस्थितांना त्यांनी आवाहन केले; आणि सर्वांना मकरसंक्रांती पर्वाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. ओंकार आठवले याने तर आभारप्रदर्शन सहायक ग्रंथपाल श्री. उत्पल वाकडे यांनी केले. या कार्यक्रमाला कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी आणि ग्रंथालय कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या (स्वायत्त) कै. बाबुराव जोशी ग्रंथालय, महाविद्यालयाचे विविध भाषा विभाग, वाचक गट, वाड्मय मंडळ, राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्यावतीने ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा २०२६’ या उपक्रमांतर्गत दि. ०१ ते १५ जानेवारी २०२६ या कालावधित ‘वाचन पंधरवडा’ विविध वाचन प्रेरणाविषयक कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे. या काळात वाचनविषयक उपक्रमांतर्गत निबंधस्पर्धा, ग्रंथ अभिवाचन, साहित्य संवाद, लेखक आपल्या भेटीला उपक्रम, ग्रंथप्रदर्शन, ग्रंथदिंडी, कर्मचारी आणि विद्यार्थी यांचे सामुहिक ग्रंथवाचन, शालेय विद्यार्थ्यांना गोष्टी आणि बोधकथा वाचन-कथन उपक्रम, पथनाट्य असे वाचन चळवळीला पुरस्कृत करणारे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.
![]() |

