मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे पहिले पुष्प आकाशवाणीचे निवृत्त कार्यक्रमाधिकारी श्री. गोविंद गोडबोले यांचे ‘सादरीकरणातील आनंद’ हे विशेष व्याख्यान डॉ. ज. शं. केळकर सेमिनार हॉल गोगटे जोगळेकर महाविद्यालय येथे नुकतेच संपन्न झाले. मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन व्हावे याकरिता दि. १ जानेवारी ते दि. १५ जानेवारी या कालावधित मराठी भाषा संवर्धन पंधरवडा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या पंधरवड्याचे औचित्य साधून महाविद्यालयाचा मराठी विभाग सातत्याने भाषा संवर्धनाच्या दृष्टीने विविध कार्यक्रमांचे नियमितपणे आयोजन करत असतो.
श्री. गोविंद गोडबोले यांनी विशिष्ट माध्यमांसाठी संहिता कशी लिहावी, संहिता लेखन करत असताना नेमक्या कोणत्या घटकांचा विचार करणे अपेक्षित आहे, संहितेचे सादरीकरण कशा पद्धतीने करावे अशा अनेक पैलूंवर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच सादरीकरणाचे विविध पैलू त्यांनी विद्यार्थ्यासमोर उलगडून दाखविले. येणाऱ्या काळात ६५% नोकरीच्या संधी प्रसारमाध्यमांत उपलब्ध असल्याकारणाने विद्यार्थ्यांनी त्याबाबत सजग राहावे, असा त्यांनी मोलाचा सल्ला दिला. सदर कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर मान्यवर पाहुण्यांसह उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये, मराठी विभाग आणि वाङ्मय मंडळ प्रमुख प्रा. शिवराज गोपाळे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. शिवराज गोपाळे यांनी तर सूत्रसंचालन डॉ. निधी पटवर्धन यांनी केले. सदर कार्यक्रमाला प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती बहुसंख्येने होती.