gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘मतदार साक्षरता’ कार्यक्रम संपन्न

Matdar Saksharta Club

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात नव मतदारांकरिता मतदान जनजागृतीपर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयाच्या ‘मतदार साक्षरता क्लब’चेही उदघाटन करण्याने आले.

राज्यशास्त्र विभागाच्या समन्वयातून १८ वर्ष पूर्ण झालेल्या मतदारांकरिता नव मतदार नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाला रत्नागिरीचे नायब तहसीलदार (निवडणूक) श्री. संजय गमरे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना ‘नवमतदारनोंदणी, निवडणुका आणि आपण’ या विषयावर मार्गदर्शन केले. यामद्धे त्यांनी भारतीय निवडणूक आयोग, त्याची रचना, अधिकार आणि कार्ये, निवडणूक यंत्रणा, नवमतदार नोंदणी इ. पैलूंवर प्रकाश टाकला.

विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरातील पात्र मतदारांना अर्ज भरण्याकरिता जागृत करून, मतदारांनी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन संदर्भात कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवता जास्तीत जास्त संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले.

प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर म्हणाले, मतदानाचा पवित्र हक्क मिळविण्याकरिता जगात विविध देशांमध्ये संघर्ष झाला आहे. संसदीय लोकशाहीची जननी असलेल्या इंग्लंडमध्येही सुरुवातीला मतदानाचा हक्क नव्हता. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारतीय संविधानाने वर्ण, धर्म, वंश, लिंग असा कोणताही भेद न ठेवता सर्वांना मताधिकार बहाल केला; असे सांगून मतदानाच्या हक्काचे महत्व विषद केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. तुळशीदास रोकडे यांनी केले. यानिमित्त मतदार नोंदणी प्रक्रिया आणि मतदान विषयक जनजागृती करणारे पोस्टर्स प्रदर्शन भरविण्यात आले होते.

कार्यक्रमाला कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये, मानसशास्त्र विभाग प्रमुख प्रा. बिना कळंबटे आदींसह विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन राज्यशास्त्र विभागाच्या प्रा. निलेश पाटील यांनी केले.

Comments are closed.