gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील प्रयोगशाळा परिचर श्री नामदेव सुवरे सेवानिवृत्त

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयात प्रयोगशाळा परिचर या पदावर कार्यरत असलेले श्री. नामदेव सुवरे आपल्या नियत वयोमानानुसार दि. २८ फेब्रुवारी २०२५ रोजी सेवानिवृत्त झाले.
महाविद्यालयाच्या मुख्य गेटवर काम करणारे नाम्या काका म्हणून ते सर्वांमध्ये परिचित होते. महाविद्यालयाच्या बागेची व्यवस्था, दत्त मंदिराची व्यवस्था, अनेक कार्यक्रम प्रसंगी स्टेजची व्यवस्था, ध्वजवंदन आणि ध्वज अवतरणाची व्यवस्था असे अनेक कामे नामदेव सुवरे यांनी चोखपणे बजावली.

या शुभेच्छा कार्यक्रमाप्रसंगी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्यावतीने कार्याध्यक्षा श्रीम.शिल्पाताई पटवर्धन यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी त्यांचा सत्कार केला. शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेच्यावतीने त्यांना धनादेश प्रदान करण्यात आला.

या निमित्ताने नामदेव काका यांनी आपल्या २९ वर्षाच्या सेवा काळातील कार्याचा लेखाजोखा मांडला. आदर्श शिक्षकेत्तर पुरस्काराने सन्मानित केलेल्या रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे त्यांनी आभार मानले. आपल्या सेवाकाळात सहकार्य करणाऱ्या सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्यावतीने श्री. संतोष जाधव यांनी नामदेव काकांच्या योगदानाचा आढावा घेतला. शिक्षक प्राध्यापक वृदांच्या वतीने डॉ. तुळशीदास रोकडे सरांनी नामदेव काकांच्या सहवासातील अनुभवांचा पट श्रोत्यांसमोर मांडला.

कर्तव्यनिष्ठ शिस्तीच्या नामदेव काकांविषयी शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये भीतीयुक्त आदर होता. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या तासाच्या वेळा पाळल्या पाहिजेत यावर नामदेव काकांचा कटाक्ष होता. विद्यार्थी व शिक्षक यांच्या पोशाखा विषयी ती नेहमी आग्रही असायचे. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर म्हणाले की, अनेक विभागात काम करताना त्यांनी कधीही पदाचा विचार केला नाही. गेटवरचे अत्यंत जोखमीचे काम नामदेव सुवरे यांनी केल्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. छंदोत्सव आणि झेप सारख्या समारंभाच्यावेळी नामदेव सुवरे यांनी आपले काम लीलया पूर्ण केले. ध्वजारोहनाचे जबाबदारीचे काम अत्यंत अचूकपणे पार पाडले अनेक सहकाऱ्यांना आपल्या कामाचा वारसा त्यांनी दिला आणि त्यांना तयार केले,असे गौरव उद्दगार त्यांनी काढले.

याप्रसंगी संस्थेचे सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दुधगीकर यांनी नामदेव सुवरे यांच्या सेवा काळातील आठवणींना उपस्थितांसमोर मांडले. गेटवरची शिस्त ही महाविद्यालयाची शिस्त सांगून जाते त्याचे प्रतिनिधित्व नामदेव सुवरे काकांनी केले अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. नामदेव काकांनी आपल्या कामातून आदर्श निर्माण केला आणि पुढील काळासाठी सहकाऱ्यांना घडविले, अशा भावना व्यक्त केल्या.

आपल्या अध्यक्षीय मनोगतामधून मा. शिल्पाताई पटवर्धन यांनी नामदेव काकांच्या कामाची दखल घेत सर्वजण नामदेव काकांच्या कामावर खुश आहेत हीच त्यांच्या कामाची पावती आहे असे गौरवोद्दगार त्यांनी काढले. अजूनही नामदेव काकांनी कामासाठी महाविद्यालयात यावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रा. तृप्ती धामणस्कर यांनी केले. या कार्यक्रमाला शिक्षक, प्राध्यापक आणि कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

श्री नामदेव सुवरे श्री नामदेव सुवरे श्री नामदेव सुवरे
Comments are closed.