संयुक्त राष्ट्र संघटनेने दि. १८ डिसेंबर १९९२ रोजी राष्ट्रीय, वांशिक, धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्यांकांच्या हक्काचा जाहीरनामा स्वीकृत करून प्रस्तुत केला. त्यामुळे दरवर्षी दि. १८ डिसेंबर हा ‘राष्ट्रीय अल्पसंख्यांक हक्क दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो. अल्पसंख्यांकांना त्यांच्या घटनात्मक आणि कायदेशीर हक्काबाबत जाणीव करून देणे, राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि ज्यांचे वंश, धर्म, भाषा बहुसंख्य लोकांव्यतिरिक्त राष्ट्राची रचना, विकास, एकता, संस्कृती, परंपरा ई राष्ट्रीय भाषा राखणे महत्वाचे आहे. या करिता गोगटे जोगळेकर महाविद्यालयाने प्रा. तुळशीदास रोकडे यांच्या अल्पसंख्यांकांचे हक्क याविषयावरील व्याख्यानाचे आयोजन केले.
याप्रसंगी बोलताना प्रा. रोकडे यांनी या दिवसाचे औचित्य सांगून शिक्षणाचा हक्क अल्पसंख्यांक जन समुदाय सोबतच राष्ट्राचा विकास घेडून येईल असे सांगितले. कायदा आणि समानतेचे तत्व संपूर्ण समाजास पुढे घेऊन जाणारे ठरेल. लो. टिळक, डॉ. आंबेडकर, म. गांधी अशा थोर विचारवंतांनी शिक्षण या हक्कास प्राधान्य दिले; असे सांगून अल्पसंख्यांकांचे अधिकार अधोरेखित केले. धर्मादाय हेतूने संस्थांची स्थापना करून ती स्वखर्चाने चालवण्याचा आणि धार्मिक गोष्टींत आपल्या व्यवहाराची व्यवस्था पाहण्याचा, मालमत्ता संपादनाचा, बाळगण्याचा आणि त्याबाबतीत प्रशासन अधिकार आहे. एखाद्या विशिष्ट धर्माच्या संवर्धनाकरिता कर देण्याची सक्ती कोणत्याही व्यक्तीवर करता येणार नाही. या कलमांचा विचार केल्यास धार्मिक समुदायांना धार्मिक व्यवस्थापन करण्याचा अधिकार आहे. मात्र अशा संस्था त्या त्या धर्मातील व्यक्तींवर कोणतीही सक्ती करू शकत नाहीत. कोणाचेही हक्क डावलले जाणार नाहीत, निधर्मी व राष्ट्रीय समानतेचा पुरस्कार केला जाईल. यासाठी पूर्ण देश आपला आहे या भावनेतून प्रत्येकाची कृती असली पाहिजे. आपल्या विचारांतून प्रा. रोकडे यांनी सद्य स्थितीतील घडामोडींवरही भाष्य केले.
या कार्यक्रमासाठी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. तीनही शाखांचे उपप्राचार्य आणि प्राध्यापक यांनी कार्यक्रम नियोजनात योगदान दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. शिवाजी उकरंडे यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. सचिन सनगरे यांनी केले.