gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर स्वायत्त महाविद्यालयातील जैवतंत्रज्ञान विभागात ‘पीएम-उषा’ अंतर्गत ‘औद्योगिक जैवतंत्रज्ञान प्रमाणपत्र अभ्यासक्रम’ यशस्वीरित्या संपन्न

पीएम-उषा (PM-USHA) योजनेच्या अंतर्गत गोगटे–जोगळेकर स्वायत्त महाविद्यालयाच्या जैवतंत्रज्ञान विभागामार्फत “Certificate Course in Industrial Biotechnology” या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे आयोजन दिनांक १२ ते १६ जानेवारी, २०२६ या कालावधीत करण्यात आले. या अभ्यासक्रमासोबतच विद्यार्थ्यांसाठी टी. जे. मरीन प्रॉडक्ट्स प्रा. लि., रत्नागिरी येथे औद्योगिक भेटीचे आयोजन देखील करण्यात आले होते.एकूण ३० विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमात सहभाग नोंदविला.

सदर अभ्यासक्रमात औद्योगिक क्षेत्रांतील तज्ज्ञ संसाधन व्यक्तींनी मार्गदर्शन केले. यामध्येश्री. सौरभ शिंदे (QA व HACCP सुपरवायझर, गद्रे मरीन एक्सपोर्ट प्रा. लि., रत्नागिरी), श्री.ओंकार केतकर (व्हेंट्री बायोलॉजिकल्स व्हॅक्सीन रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर, पुणे), श्री. बॉस्को बोथेलो (सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, पुणे), श्रीमती. सिद्धी राउळ (मोलबायो डायग्नोस्टिक्स प्रा. लि., गोवा) आणि श्रीमती. प्रिती आंब्रे (टी. जे. मरीन प्रॉडक्ट्स प्रा. लि., रत्नागिरी) यांचा समावेश होता.

कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी पीएम-उषा समन्वयक व विज्ञान शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, कार्यक्रम समन्वयक प्रो. डॉ. यास्मीन आवटे, उपक्रम संयोजिका व जैवतंत्रज्ञान विभागप्रमुख प्रा. रश्मि भावे, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतरकर्मचारी व सहभागी विद्यार्थी उपस्थित होते. उद्घाटनपर भाषणात प्रा. रश्मि भावे यांनी जैवतंत्रज्ञान व इतर औद्योगिक क्षेत्रांतील आगामी करिअर संधी लक्षात घेऊन अशा अभ्यासक्रमांची गरज स्पष्ट केली. प्रमुख पाहुणे श्री. सौरभ शिंदे यांनी जैवतंत्रज्ञान उद्योगांपर्यंत सुलभ प्रवेश मिळवून देण्यासाठी अशा कार्यशाळांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यानंतर प्रो. डॉ. यास्मीन आवटे यांनी शिस्तबद्ध दृष्टिकोन व सातत्याने कौशल्यांचा औद्योगिक क्षेत्रात योग्य वापर करण्याबाबत मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी शैक्षणिक अभ्यासक्रमातील औद्योगिक जैवतंत्रज्ञानाशी संबंधित तंत्रे व कौशल्ये प्रत्यक्ष औद्योगिक जगाशी सुसंगत करण्याचे महत्त्व नमूद केले. उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालनप्रा. समिधा शिंदे यांनी केले.

पाच दिवस चाललेल्या या कार्यशाळेत औद्योगिक जैवतंत्रज्ञानातील शैक्षणिक व व्यावहारिक ज्ञानाचे महत्त्व, वाढत्या रोजगार संधी, फर्मेंटरची रचना व कार्यपद्धती, आम्ले, अल्कोहोल व प्रतिजैविके यांसारखी किण्वन उत्पादने, QA व QC संकल्पना, किण्वन उत्पादनांचे डाउनस्ट्रीम प्रोसेसिंग, GMP व GLP, SOP निर्मिती, औद्योगिक जैवतंत्रज्ञानाशी संबंधित कायदे व नियमावली आदी विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यासोबतचया कार्यशाळेत जैव-औषधनिर्मिती उद्योगाची व्हर्च्युअल लॅब टूरही विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली.कार्यशाळेच्या अंतिम दिवशी सर्व सहभागी विद्यार्थ्यांसाठी टी. जे. मरीन प्रॉडक्ट्स प्रा. लि., रत्नागिरीयेथे औद्योगिक भेट आयोजित करण्यात आली. या भेटीद्वारे विद्यार्थ्यांना उद्योगाची प्रत्यक्ष रचना व कार्यपद्धती समजून घेण्याची संधी मिळाली.

जैवतंत्रज्ञान विभाग, गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त)येथे या कार्यशाळेचा समारोप समारंभ संपन्न झाला.समारोप समारंभात सर्व मान्यवर व प्रातिनिधिक स्वरुपात विद्यार्थ्यांनी आपली मनोगते मांडली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रा. रश्मि भावे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. मकरंद साखळकर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. तसेच जैवतंत्रज्ञान विभागातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे देखील सहकार्य लाभले.

Comments are closed.