गोगटे जोगळेकर (स्वायत्त) महाविद्यालयात केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उच्चतर शिक्षण अभियानांतर्गत विद्यार्थ्यांसाठी सॉफ्ट स्किल विकसित व्हावी म्हणून मराठी विभागातर्फे ‘अन्न, पोषण आणि पाककला’ या अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक १६ नोव्हेंबर २०२४ ते ३ डिसेंबर २०२४ या कालावधीत मुख्य इमारतीच्या रसायनशास्त्र विभागाच्या प्रयोगशाळेत हा तीस तासांचा अभ्यासवर्ग संपन्न झाला. एकूण तीस विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमासाठी नोंदणी केली होती.
विद्यार्थ्यांना अन्नविज्ञान, पोषण आणि स्वयंपाक तंत्राची माहिती व्हावी तसेच विद्यार्थ्यांमध्ये विविध कौशल्ये विकसित व्हावी हा या अभ्यासक्रमाचा उद्देश होता. समुपदेशक शमीन शेरे यांनी मुख्य साधन व्यक्ती म्हणून या अभ्यासवर्गाला मार्गदर्शन केले.
सदर कार्यशाळेत पोषणमूल्य आणि आरोग्य, मूलभूत पाककला कौशल्य, स्वयंपाक घरात वापरायची भांडी व विविध उपकरणे यांची ओळख व त्यांचा प्रत्यक्ष वापर, भाजणे, तळणे, वाफवणे सारख्या मूलभूत स्वयंपाकाची तंत्रे, संपूर्ण भोजन तयारी, प्रत्यक्ष भोजन बनवण्याची आणि वाढण्याची प्रक्रिया यासाठी वेळेचे नियोजन, लहान मुले, तरुण मुले आणि वयोवृद्ध माणसे यांचा आहार कशा प्रकारचा असावा, त्यांच्यासाठी जेवण बनवताना कोणत्या गोष्टी विचारात घ्याव्यात, पदार्थ कसे बनवावेत, किराणा मालाची दुकाने, वस्तूंचे दर, विविध धान्य आणि बिया यांची ओळख अशा विविध विषयांवर विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिका सहित मार्गदर्शन करण्यात आले.
अन्न, पोषण आणि पाककला या अभ्यासक्रमामध्ये बाजारातून अन्नपदार्थ खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी, पदार्थातील नैसर्गिक व रासायनिक घटक कसे ओळखावेत याचा प्रत्यक्ष अनुभव देखील विद्यार्थ्यांना देण्यात आला. अन्नपदार्थ कसे साठवून ठेवावेत, ते टिकवण्यासाठी कोणती तंत्र वापरावीत याचेही मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना भारतीय पदार्थांबरोबरच इटालियन, चायनीज, अमेरिकन, युरोपियन, कॉन्टिनेन्टल तसेच पारंपरिक अशा खाद्य संस्कृतीचा परिचय करून देण्यात आला.
अभ्यासवर्गाला सुरुवात करण्यापूर्वी विद्यार्थ्यांची पूर्व परीक्षा घेण्यात आली आणि अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर अवगत कौशल्यांवर आधारित परीक्षा घेण्यात आली. अभ्यासवर्गाच्या निरोप समारंभाला विद्यार्थ्यांनी स्वतः पदार्थ बनवून त्यांचे सादरीकरण केले. सदर अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. पी एम उषा समन्वयक डॉ. अपर्णा कुलकर्णी, स्किल डेव्हलपमेंट कोर्सच्या समन्वयक प्रो.डॉ. चित्रा गोस्वामी, रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एम. जी. गोरे, मराठी विभाग प्रमुख प्रो. डॉ. शिवराज गोपाळे, डॉ. निधी पटवर्धन यांनी प्रमाणपत्रांचे वितरण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सीमा वीर यांनी केले.