गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या वनस्पतिशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख कै. प्रा. पी. एन. देशमुख स्मृतीप्रित्यर्थ नुकतेच कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने ‘ग्रीन अॅवेन्युज’ (हरित मार्ग) या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, इको सपोर्ट, ठाणे या संस्थेचे संचालक आणि महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री. निरंजन कोळेकर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना वनस्पतीशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. मंगल पटवर्धन यांनी प्रा. पी. एन. देशमुख यांच्या स्मृतींना उजाळा दिला आणि कार्यशाळेच्या आयोजनामागील पार्श्वभूमी विषद केली. यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करून प्रा. देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यशाळेचे तज्ज्ञ मार्गदर्शक श्री. निरंजन कोळेकर यांचा परिचय प्रा. शरद आपटे यांनी करून दिला. त्यानंतर पाहुण्यांचा सत्कार कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन यांच्या हस्ते संपन्न झाला.
वनस्पतीशास्त्र विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या पोस्टर आणि पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेत प्रथम क्रमांक पूजा महेश शेलार आणि मानली मोहन धांगडे; द्वितीय क्रमांक दानिया नझीर मुल्ला; तृतीय क्रमांक मानसी सुहास करंदीकर यांना तर पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन स्पर्धेकरिता प्रथम क्रमांक शिवानी मिलिंद सुर्वे; द्वितीय क्रमांक परेश गणपत गुरव आणि तृतीय क्रमांक जुवेरीया अझिम जमादार यांनी पटकवला. महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख प्रा. जी. एस. कुलकर्णी यांच्या देणगीतून या स्पर्धेची बक्षिसे देण्यात येतात.
प्रमुख अतिथी कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना वेळेचे महत्व ओळखून वाटचाल करण्याचे आवाहन केले. कार्यशाळेचे मार्गदर्शक श्री. निरंजन कोळेकर यांनी सत्काराला उत्तर देताना कार्यशाळेला आमंत्रित केल्याबद्दल आभार व्यक्त केले. प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी वैविध्यपूर्ण उपक्रम नियमितपणे आयोजित करणाऱ्या वनस्पतीशास्त्र विभागाचे अभिनंदन केले.
या कार्यक्रमाला उपप्राचार्य विवेक भिडे, महाविद्यालयातील प्राध्यापक, पदवी आणि पदव्युत्तर विभागातील विद्यार्थी, मुंबई विद्यापीठ उपकेंद्रातील पर्यावरणशास्त्र विभागातील विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन डॉ. सोनाली कदम यांनी केले.