gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘भारतीय प्रजासत्ताक दिन’ विविध उपक्रमांनी साजरा

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ७६वा प्रजासत्ताक दिन विविध कार्यक्रमांनी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळी महाविद्यालयाच्या जवाहर क्रीडांगणावर ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम संपन्न झाला. प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रा. दिलीप सरदेसाई नेतृत्वाखाली राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी शानदार संचालन केले. प्रा. डी. आर. वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली वाद्यवृंदाने राष्ट्रगीत सादर केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लेफ्ट. डॉ. स्वामिनाथन भट्टार यांनी केले. या कार्यक्रमानंतर महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात ‘भारतीय संविधान विषयक’ ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर मुख्य इमारतीत गणित विभागाच्या गणित विषयक, माहिती तंत्रज्ञान विभागाच्या तंत्रज्ञान विषयक आणि महिला विकास कक्षाच्या ‘मिळून साऱ्याजणी’ या भित्तीपत्रकाचे अनावरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात संपन्न झालेल्या मुख्य समारंभात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कनिष्ठ महाविद्यालयाच्या ‘सहकार’ आणि ‘ई सहकार’ या वार्षिकांकाचे प्रकाशन करण्यात आले. ‘छंदोत्सव’ या सांस्कृतिक युवा महोत्सवाचा फोटो अल्बम प्रकाशित करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. वैभव कानिटकर यांनी केले.

भौतिकशास्त्र विभागाचे माजी विद्यार्थी मान. श्री. अजय पटवर्धन यांनी महाविद्यालयाला कै. केशव अनंत पटवर्धन यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिलेल्या रु. २ लाख देणगीच्या व्याजातून भौतिकशास्त्र विभागातील एका हुशार विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती देण्याच्या उपक्रमांतर्गत कु. यश देविदास याला शिष्यवृत्ती मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली.

महाविद्यालयाच्यावतीने देण्यात येणारे विविध पुरस्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. वरिष्ठ महाविद्यालयाचा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ प्रा. अरुण यादव यांना तर कनिष्ठ महाविद्यालयाचा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ प्रा. प्रसाद गोखले यांना प्राप्त झाला. सौ. जान्हवी विचारे यांना ‘आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. ग्रंथालयाचा आदर्श शिक्षक वाचक ‘ग्रंथरत्न’ पुरस्कार राज्यशास्त्र विभागाच्या प्रा. निलेश पाटील यांना तर वरिष्ठ महाविद्यालयातील कु. ओमकार आठवले आणि कनिष्ठ महाविद्यालयातील कु. नीरज लाड यांना आदर्श विद्यार्थी वाचक ‘ग्रंथरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी आपल्या मनोगतामध्ये महाविद्यालयाने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचा आढावा घेतला आणि नियोजित उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. विविध क्षेत्रात महाविद्यालयाला प्राप्त झालेल्या यशाबद्दल त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले. महाविद्यालयाचे सुयश हे सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी या सर्वांचे आहे असे प्रतिपादन केले.

या कार्यक्रमाला डॉ. अजय पटवर्धन, सेवानिवृत्त प्राध्यापक, सेंट झेवियर महाविद्यालय, मुंबई हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. व्यासपीठावर संस्थेचे सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दुदगीकर; प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई; कला, विज्ञान आणि वाणिज्य विभागांच्या उपप्राचार्या अनुक्रमे डॉ. चित्रा गोस्वामी, डॉ. अपर्णा कुलकर्णी आणि डॉ. सीमा कदम; कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी आदि मान्यवर उपस्थित होते.

वरिष्ठ आणि कनिष्ठ माविद्यालायातील प्राध्यापक, अध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी सदर कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. तृप्ती धामणस्कर यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. मेघना म्हादये यांनी केले.

Comments are closed.